Pandit jawaharlal Nehru : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रांवरून गदारोळ झाला आहे. सोमवारी संसदेतही हा मुद्दा गाजला. नेहरूंच्या पत्रांच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप खासदार संबित पात्रा यांनी विचारले की, ‘या पत्रांमध्ये असे काय आहे जे देशातील जनतेला कळू नये असे गांधी परिवाराला वाटते? पंडित नेहरूंनी लेडी एडविना माउंटबॅटन आणि इतरांना काय लिहिले होते, जे लपविण्याचा प्रयत्न केला गेला.
हा संपूर्ण वाद पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटीचे सदस्य रिझवान कादरी यांनी खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर सुरू झाला. या पत्रात त्यांनी राहुल गांधी यांना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पत्र परत करण्यास सांगितले आहे. ही पत्रे 2008 मध्ये सोनिया गांधींना पाठवण्यात आली होती.
पंडित नेहरूंनी कोणाला पत्रे लिहिली होती?
2008 मध्ये, यूपीए राजवटीत, 51 बॉक्समध्ये पॅक केलेली नेहरूंची वैयक्तिक पत्रे सोनिया गांधींना देण्यात आली होती. ही पत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटीमधून घेण्यात आली आहेत. पीएमएलचे म्हणणे आहे की, माजी पंतप्रधानांची ही पत्रे ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ती कुणाची वैयक्तिक मालमत्ता कशी असू शकतात? त्यामुळे या वस्तू संग्रहालयात परत करण्यात याव्यात. असं ते म्हणाले आहेत.
– एडविना माउंटबॅटन (भारतातील ब्रिटनचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या पत्नी)
– अल्बर्ट आइनस्टाईन (जगप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ)
– जयप्रकाश नारायण (भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी)
– पद्मजा नायडू (भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी)
– विजया लक्ष्मी पंडित (विजय लक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहिणी होत्या)
– अरुणा असफ अली (भारतीय शिक्षक, राजकीय कार्यकर्ते आणि प्रकाशक)
– बाबू जगजीवन राम (भारताचे पहिले दलित उपपंतप्रधान आणि स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी)
– गोविंद बल्लभ पंत (स्वातंत्र्य संग्राम सेनानी)
सोनिया गांधींपर्यंत पत्रे कशी पोहोचली?
पंडित नेहरूंची ही पत्रे जवाहरलाल नेहरू मेमोरिअलने 1971 मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला दिली होती, जे आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. स्मारकासाठी दान केलेली ही कागदपत्रे आहेत. 2008 मध्ये सोनिया गांधींच्या सूचनेनुसार पंडित नेहरूंची पत्रे आणि इतर कागदपत्रे कथितरित्या संग्रहालयातून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही पत्रे 51 बॉक्समध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचवण्यात आली होती.
पत्रे लपवायची काय गरज? भाजपचा सवाल :
पंडित नेहरूंची पत्रे का लपवली जात आहेत, असा प्रश्न भाजप खासदार संबित पात्रा यांनी संसदेत उपस्थित केला. पंडित नेहरू आणि माऊंट बॅटन यांच्या पत्नी यांच्यात लिहिलेली पत्रे गहाळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. नेहरू आणि जयप्रकाश नारायण यांच्यात पत्राद्वारे झालेला संवाद हा राष्ट्रीय वारसा आहे आणि ती पत्रे परत केली पाहिजेत. काँग्रेसवर ताशेरे ओढत संबित पात्रा म्हणाले, नेहरूजींनी एडविना माउंटबॅटन यांना काय लिहिले असेल, ज्याला सेन्सॉर करण्याची गरज होती, याची मला उत्सुकता आहे.
इतिहासकार कादरी यांनी एक पत्र लिहिले आहे की, राहुल गांधींनी त्यांच्या आईशी (सोनिया गांधी) बोलून नेहरूंची ती सर्व पत्रे परत करावीत, कारण ही राष्ट्राची वारसा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे पूर्वीचे पंतप्रधान कोणाशी बोलत होते आणि कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत होते हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. कादरी यांनी सांगितले की, सोनिया गांधींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राहुल गांधींना दुसरे पत्र लिहिले.