विविधा : पंडित दीनदयाल उपाध्याय

माधव विद्वांस

अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, पत्रकार, नाटककार, भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा उद्या जन्मदिन. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी चंद्रभान गाव, मथुरा येथे झाला. ते 8 वर्षांचे असतानाच त्यांचे मातृपितृछत्र हरपले. त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला व शिक्षणही दिले. त्यांचे माध्यमिक शिक्षण राजस्थान- सीकर येथे झाले. त्यांना सीकरच्या महाराजांनी त्यांची हुशारी पाहून सुवर्णपदक, 250 रुपये शिष्यवृत्ती दिली होती. इंटरमिजिएट परीक्षा पिलानी येथे उत्तीर्ण झाले. कानपूरच्या सनातन धर्म महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिक्षणशास्त्रातील पदवी प्राप्त केली.

त्यांनी 1940च्या दशकात लखनौ येथून मासिक राष्ट्र धर्माचे प्रकाशन सुरू केले. राष्ट्रवादी विचारधारा पसरवण्यासाठी त्यांनी साप्ताहिक पांचजन्य हे साप्ताहिक व दैनिक स्वदेश सुरू करून पत्रकारितेतही काम सुरू केले. एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांची ओळख आहे. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा पैलू होता. शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्त्विक ग्रंथांच्या अभ्यासातून त्यांनी “एकात्म मानववाद’ हा सिद्धान्त मांडला. ते स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. 

1951 नंतर श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघ या पक्षात ते सामील झाले. ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव बनले. त्यांचा भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर महत्त्वाचा वाटा होता. जनसंघ स्थापनेपासून त्यांनी 1967 पर्यंत पक्षाचे महासचिवपद सांभाळले. दीनदयाल उपाध्याय, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विश्‍वासातील प्रमुख कार्यकर्ते होते. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्‍चात त्यांनी जनसंघ वाढविण्यासाठी भरपूर श्रम घेतले.

त्यांनी अर्थशास्त्रावरदेखील लिखाण केले आहे. “चंद्रगुप्त’ हे नाटकही त्यांनी लिहिले. चंद्रगुप्त मौर्य, शंकराचार्यांचे हिंदीतील चरित्र लिहिले, तसेच केशव हेडगेवार यांचे हिंदीत चरित्र लिहिले.

पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बॅंक योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बॅंक योजना, मेक इन इंडिया आदी सध्याच्या योजनांमध्येही त्यांच्या एकात्मवादाचा विचार केला आहे. दिल्लीमध्ये दीनदयाल रिसर्च सेंटर आहे. त्याचे अध्यक्ष महेश शर्मा यांनी दीनदयाल यांच्यावर 14 पुस्तके लिहिली आहेत.

“दीनदयाल एक युगपुरुष’ नावाचा हिंदी चरित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात दीनदयालांची भूमिका इमरान हसनी यांनी आणि तरुण दीनदयालांची भूमिका निखिल पितळे यांनी साकारली आहे. 11 फेब्रुवारी 1968 रोजी त्यांचा मृतदेह मुघलसराय स्टेशन परिसरात रुळावरती संशयास्पदरित्या आढळून आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.