पंढरपुरा नेईन गुढी

– डॉ. विनोद गोरवाडकर 

“माझ्या जीवाची आवडी। पंढरपूरा नेईन गुढी। पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले।।” या शब्दांत ज्ञानदेवांनी पंढरीच्या वारकऱ्यांचे कौतुक केले आहे. आषाढी-कार्तिकी एकादशी या वर्षातील अतिशय दोन महत्त्वाच्या तिथी वारकरी संप्रदायात मानल्या जातात. गावागावांतील वारकरी पायी आपल्या लाडक्‍या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी धावत येतात. विठुरायाचे दर्शन घेतले की किंवा दर्शन न होता विठ्ठल मंदिराच्या नुसत्या कळसाचेही दर्शन झाले तरी “भाग गेला, शीण गेला। अवघा झाला आनंद” अशी अवस्था दूरदूरहून पायी आलेल्या वारकऱ्यांची झाल्याशिवाय राहत नाही..

पंढरपूरची वारी हा एक अद्‌भूत सोहळा आहे. दिंड्या-पताकांबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात पुढे सरकरणारा प्रत्येक वारकरी हा सामान्य नाहीच मुळी. तो पंढरीला न येणाऱ्या प्रत्येक विठुभक्तासाठी एक उर्जा प्रदान करणारा शक्तिकेंद्र बनतो. टी.व्ही.वर, वृत्तपत्रात फोटो मजकुराद्वारे जेव्हा वारीची चित्रे दृष्टीस पडतात, त्यावेळी प्रत्येकाला वारीत सामील व्हावेसे वाटू लागते.

“वारी करणारा तो वारकरी’ अशी सोपी व्याख्या वारकऱ्याची करता येत असती तरी “वारी’ म्हणजे नेमके काय याचा शोध घ्यावा लागतो. घरातून निघालो आणि पायी पंढरपूरला गेलो म्हणजे झाली वारी एवढे सोपे ते नाही. वारी म्हणजे प्रवाशांची टोळी आणि वारकरी म्हणजे वारीला जाणारा प्रवासी, असा अर्थ घेत असतानाच ज्येष्ठ अभ्यासक शं. वा. दांडेकरांनी वारी-वारकरी आणि वाकरी संप्रदाय याविषयी अतिशय सुस्पष्ट शब्दांत विश्‍लेषण केले आहे. ते म्हणतात, “”प्रतिवर्षी अगर प्रत्येक महिन्यात नियमितपणे पवित्र स्थळाच्या यात्रेत जाण्याची प्रथा, असा या वारी या शब्दाचा रूढ अर्थ होय. वारकऱ्यांच्या बाबतीत हे पवित्र स्थळ म्हणजे श्रीविठ्ठल अगर पांडुरंग या दैवताचे निवासस्थान पंढरपूर होय. या दृष्टीने आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरास जातो तो पंढरपूरचा वारकरी म्हटला जातो व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो “वारकरी पंथ’ होय.”

आषाढ शु।। 11 हा खऱ्याअर्थाने वारीचा मुख्य दिवस तर आळंदीच्या वारीचा महत्त्वाचा दिवस कार्तिक व।। 11 हा होय. भक्तीच्या समान सूत्रासह एकत्र आलेले सारे वारकरी एकमेकास उराउरी भेटतात. त्यावेळी तो सोहळा आपोआप अनुपम्य होऊ जातो. वारकरी होऊन पंढरपुरास जाण्याचा आनंद अलौकिक आहे. वारकऱ्याचा भूमिकेतून पंढरपूर बघणे, तेथे वावरणे, त्या आचार-विचारांच्या सूत्रात स्वतःला गुंफून पंढरीराणाच्या चरणी लीन होणे, हा वारकऱ्याच्या जीवनातला कलशाध्याय म्हणावा लागेल. तुकोबाराय म्हणतात,

“होय होय वारकरी।
पाहे पाहे पंढरी।
काय करावी साधने।
फळ अवघेचि तेणे।
अभिमान मुरो।
कोड अवघेची फुटे।
तुका म्हणे डोळा।
विणे बैसला सावळा।”

हा वरवर साधासुधा वाटणारा अभंग वारकऱ्याला सखोल उपदेशाची वाट दाखविणारा वाटाड्या आहे. वारकरी होऊन पंढरीत जाणाऱ्या वारकऱ्याचा अभिमान संपुष्टात येतो आणि सावळा विठोबा त्याच्या डोळ्यात येऊन बसतो. विठ्ठालाच्या चिंतनाशिवाय त्याला दुसरे काही सुचत नाही आणि ही सारी अनुभूती येण्यासाठी “वारकरी’ व्हावे लागते. वारकऱ्याची मुख्य साधना, मुख्य आचारधर्म श्रीविठ्ठलाची वारी ही आहे. संतसमागम, नामस्मरण, हरिकीर्तन, सदाचार या गोष्टी त्याने मनापासून कराव्यात म्हणजे त्याला जीवन जगण्याची कला आपोआप प्राप्त होईल असे संतांनी अनेक दाखले देऊन समजावले आहे. वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे “प्रपंचात राहून परमार्थ करण्याचे’ सूत्र त्यांनी दिले आहे. प्रपंचात राहून हरिभक्तीच्या मार्गावर चालण्याची सुलभ साधना सहजगत्या कोणालाही करणे सहजशक्‍य आहे याची खात्री येथे पटते. विठ्ठलाचे ध्यान, नामस्मरण, तुळशीला पाणी घालणे, ज्ञानेश्‍वर-तुकारामांच्या ग्रंथांमधील ओव्या-अभंगांचे वाचन करणे या गोष्टींचा अवलंब करणारा वारकरी खऱ्याअर्थाने वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान जगत असतो.

वारी हा वारकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वर्षांनुवर्षे तेवढ्याच ओढीने पंढरीस पायी जाणारा प्रत्येक वारकरी हा मराठी भूमीत भक्तीचा मळा फुलविणारा खराखुरा आस्तिक म्हणावयास हवा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.