Anil Sawant Meets Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. अनिल सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. त्यांनी विधानसभेला शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.
जरांगे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती देताना सावंत म्हणाले की, मनोज जरांगे यांना भेटून आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करणार आहेत.
दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळं या निवडणुकीत विजय आमचाच होणार असल्याचा विश्वास देखील अनिल सावंत यांनी यावेळी बोलून दाखवला.
अनिल सावंत यांचा समाधान आवताडे यांच्याशी सामना –
दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनिल सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी जाहीर केल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात पुन्हा भाजपच्या समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे.