सोलापूर :- देशात चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे, असे साकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंढरीच्या विठूरायाला घातले. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मंगळवारी सोलापुरातून आपल्या सहकारी बांधवांसह पंढरीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या गाडीवर पुष्पृष्टी करून स्वागत करण्यात आले.
आषाढी यात्रा सुरू असून पंढरपुरात लाखो भावीक दाखल झाले असल्याने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी आहे. भाविकांना वाहनाचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे चौफाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत काही मंत्री, आमदारांसह चालत गेले. यावेळी त्यांच्या समवेत भगीरथ भालके उपस्थित होते.
विठ्ठल मंदिरात सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री चंद्रशेखर राव व मंत्री आमदार गेले. त्यांनी विठ्ठलास रेशमी पांढऱ्या रंगाचा पोशाख व रुक्मिणी मातेस गुलाबी रंगाची पैठणी अर्पण केली. नंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन देशात पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे असे साकडे घातले.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा येथे सन्मान केला.