पंढरपुर आंदोलन प्रकरण; प्रकाश आंबेडकरांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर गुन्हा

पंढरपूर : ‘विठ्ठल मंदिर खुलं करा,’ या मागणीसाठी पंढरपुरात काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे यांनी या गुन्ह्याची फिर्याद दिली असून आता सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत काल (31 ऑगस्ट) पंढरपुरात आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही.

संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे वंचितांचे नेते प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.