मुंबई – राज्यात एकाबाजूला सर्वसामान्य माणूस विविध अडचणींचा सामना करत असताना सरकारकडून सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना घेऊन मोठ मोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. पण कितीही जाहिराती केल्या तरी सरकारचा खरा चेहरा लपला जाणार नाही.
पोलिसांचा वापर गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत आणि गद्दारांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत, असे प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला.
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीकडून महायुती सरकारविरोधात गद्दारांचा पंचनामा प्रकाशित करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया धुळे, संजय राऊत उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. अडीच वर्षात यांनी कसे सरकार चालवले याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तिचे लोक आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला.
देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वत:च राजकारण कसे करायचे हेच यांच्या डोक्यात आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर शरद पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की हत्या प्रकरणाची अद्याप योग्य माहिती आमच्याकडे आलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे तपासावर परिणाम होईल, असे काही बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या निकाल काहींनी मान्य केला नाही, तेव्हा लोकांनी बदल हवा आहे हे सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांचा पंचनामा आम्ही केला आहे. महाराष्ट्राबरोबर यांनी गद्दारी केली आहे. येत्या दीड महिन्यात हे सरकार घालवायला हवे. मुंबई हे असे शहर आहे तिथे २ पोलिस कमिशनर आहेत. जे जे लाडके आहेत त्यांना कमिशनर करा.
पाच कमिशनर करा. माझे स्पष्ट म्हणणे आहे की, जी गद्दारांना सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढा आणि लोकांसाठी वापरा. ही जबाबदारी गृहमंत्री यांची आहे, असा आरोपही त्यांनी केला.