पंचायत समिती सभापती आरक्षणाचे इच्छुकांना वेध

राज्यातील सत्ता परिवर्तनामुळे होणार वर्चस्वाची लढाई
संतोष पवार
सातारा – जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदासाठी बुधवार, 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांचे वेध लागून राहिले आहे. राज्यातील सत्ता परिवर्तन आणि निवडणुकीपूर्वी झालेले पक्ष प्रवेश यामुळे सभापतीपद खेचून आणण्यासाठी वर्चस्वाची लढाई होण्याचे संकेत आहेत.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिल्याने 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. सातारा, जावळी, महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव, पाटण या दहा पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. कराड तालुक्‍यात सभापती निवडीसाठी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. आ. बाळासाहेब पाटील यांनी विलासकाकांना बरोबर घेवून राष्ट्रवादीकडे सभापतीपद खेचून आणले होते. राष्ट्रवादीचा पर्यायाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यूहरचना आखली.

उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे असे दिग्गज भाजपच्या गळाला सापडले. त्यामुळे काही अंशी राष्ट्रवादीला भगदाड पडले. या राजकीय बदलाचा जिल्हा परिषदेमध्ये फारसा परिणाम झाला नाही. मात्र सातारा व जावळी पंचायत समितीवर शिवेंद्रराजेंच्या रुपाने भाजपचा झेंडा फडकला. जिल्ह्यात अन्य ठिकाणी फारसा परिणाम झाला नाही.
सातारा पंचायत समितीत शिवेंद्रसिंहराजे यांना मानणारे 11 तर माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे 9 सदस्य आहेत. सध्या मिलिंद कदम सभापती तर जितेंद्र सावंत उपसभापती आहेत. या पंचायत समितीत कोणतेही आरक्षण पडले तरी सत्ता भाजपाकडेच राहण्याची शक्‍यता असून याठिकाणी फारसी स्पर्धा होणार नाही. कोरेगाव तालुक्‍यात सभापतीपद खुले असल्याने शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ जगदाळे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदावर उत्तर कोरेगावमधून संजय साळुंखे यांची वर्णी लागली होती. कोरेगाव पंचायत समितीमध्येही शशिकांत शिंदे यांचाच वरचष्मा कायम राहण्याची शक्‍यता आहे.

फलटण पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी राखीव होते. याठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती. फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असल्याने आरक्षण काहीही पडले तरी सत्ता राष्ट्रवादीच राहणार आहे. माण पंचायत समितीत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला धूळ चारली होती. सभापतीपद अनुसुचित जातीसाठी राखीव असल्याने रमेश पाटोळे यांची वर्णी लागली होती. आ. जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात माण तालुक्‍यात राजकारण बदलणार आहे. आ. गोरे यांच्याबरोबर कोण- कोण जाणार यावर सभापती राष्ट्रवादीचा होणार की भाजपचा हे स्पष्ट होणार आहे. खटाव तालुक्‍यातील 12 पैकी आठ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. सभापतीपद खुले असल्याने सभापतीपदी संदीप मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे यांची निवड झाली होती.

आरक्षण सोडतीनंतर खटाव पंचायत समितीत फारसा फरक पडणार नसून सत्ता राष्ट्रवादीचीच राहणार असल्याचे संकेत आहेत. वाई पंचायत समिती आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने कॉंग्रेसला शह देत एकहाती सत्ता मिळवली होती. मदन भोसले यांना शह देण्यासाठी सौ. रजनी भोसले यांना सभापतीपद तर केंजळ गणातील अनिल जगताप यांना उपसभापतीपद मिळाले होते. खंडाळा पंचायत समितीत सहा जागांपैकी राष्ट्रवादी तीन, कॉंग्रेस एक आणि अपक्ष दोन अशा जागा निवडून आल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसचा हात धरला होता. सभापतीपदी मकरंद मोटे व उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या वंदना धायगुडे यांची वर्णी लागली होती. सद्य परिस्थितीत विद्यमान सभापती एका गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत तर कॉंग्रेसचे मदन भोसले यांची भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.

याठिकाणी आरक्षण काय पडतेय यावर कोणाचा सभापती होणार हे सिध्द होणार आहे. जावळी पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वच्या सर्व 11 जागा मिळवल्या होत्या. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. अरुणा शिर्के सभापती तर दत्तात्रय गावडे उपसभापती झाले होते. मात्र शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केल्याने याठिकाणी पूर्णपणे भाजपची सत्ता आली आहे. आरक्षण सोडतीत कोणतेही आरक्षण पडले तरी शिवेंद्रराजे म्हणतील तो सभापती होणार आहे. महाबळेश्‍वर तालुक्‍यात राष्ट्रवादीने तीन तर शिवेसेनेन एक जागा मिळवली होती. सभापतीपद खुले असल्याने संजय गायकवाड व रुपाली राजपुरे यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. राजेंद्रशेठ राजपुरे यांनी आपले राजकीय वजन वापरत रुपाली राजपुरे यांना सभापतीपद खेचून आणले. अंजना कदम यांना उपसभापती पद मिळाले.

पाटण तालुक्‍यात शंभूराज देसाई गटाला शह देत सत्यजितसिंह पाटणकर यांनी पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली. सभापतीपदी उज्वला जाधव तर उपसभापतीपदी राजाभाऊ शेलार यांची वर्णी लागली होती. कराड तालुक्‍यात राष्ट्रवादीला सात, उंडाळकर गटाला सात, भाजपला सहा, कॉंग्रेसला चार असा संमिश्र कौल मिळाला होता. याठिकाणी सभापती निवडीत नाट्यमय घडामोडी घडत राष्ट्रवादी कॉंग्रेसला उंडाळकर गटाने साथ दिल्याने सभापतीपद राष्ट्रवादीला मिळाले होते. 2017 च्या निवडणूक निकालानंतर सर्वच्या सर्व 11 सभापतीपदे राष्ट्रवादी कॉंग्रेसने खेचून आणून बालेकिल्ला शाबित ठेवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्ष बदलामुळे सातारा, जावली पंचायत समिती शिवेंद्रराजेंच्या ताब्यात जाणार आहे. खंडाळ्यातही आरक्षणावर कोणाचा सभापती होणार हे स्पष्ट होणार आहे. माण आणि कराडमध्येही काय नाट्यमय घडामोडी होतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. सद्य परिस्थितीत तरी सभापतीपदासाठी इच्छुकांना बुधवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.