पंचायत समिती “सभापति’पदाची पंचाईत

जिल्ह्यातील 13 सभापतिपदासाठी इच्छुकांची मांदियाळी : पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू
रोहन मुजूमदार

पुणे  – जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभातिपदासाठी आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 13) जाहीर करण्यात आली. यासाठी आता इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली असून सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे. राज्यात महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांनी हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे पंचायत समिती सभापतिपदांबाबत निर्णय घेताना या पक्षांना एकमेकांच्या विरोधात उतरावे लागणार आहे. राज्यात सत्तेसाठी वापरलेला फॉर्म्युला सभापतिपदासाठीही अवलंबला जातो की तिनही पक्ष “एकला चलोचा नारा’ देणार याकडे इच्छुकांसह जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील 13 पंचायत समितीपैकी सात राष्ट्रवादी कॉंग्रेस, तीन शिवसेना, दोन कॉंग्रेस तर एक भाजपच्या ताब्यात आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रसच्या ताब्यात बारामती, आंबेगाव, भोर, दौंड, हवेली, मुळशी, शिरूर तर शिवसेनेच्या ताब्यात जुन्नर, खेड, पुरंदर, कॉंग्रेसच्या ताब्यात इंदापूर, वेल्हे तर भाजपकडे मावळ पंचायत समिती आहे. त्यामुळे भाजपपेक्षाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. मात्र, सत्तेत झालेल्या वेगळ्या समिकरणामुळे पक्षश्रेष्ठी स्थानिक ठिकाणी एकमेकांस सहाय्य करून एन नवा पायंडा पाडणार की पाडापाडीसाठी एकमेकांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस-शिवसेना आपले उमेदवार देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुका पक्षनिहाय यांच्या नावांची चर्चा

खेड (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – शिवसेना : ज्योती अरगडे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर, अंकुश राक्षे, विद्यमान सभापती भगवान पोखरकर. कॉंग्रेस : अमोल पवार. राष्ट्रवादी कॉंग्रेस : अरूण चौधरी.
भोर (सर्वसाधरण प्रवर्ग)- राष्ट्रवादी कॉंग्रेस : लहुनाना शेलार, श्रीधर किंद्रे, मंगल बोडके दमयंती जाधव. कॉंग्रेस : रोहन बाठे. शिवसेना : पुनम पांगारे.
आंबेगाव (अनुसुचित जमाती) – राष्ट्रवादी कॉंग्रेस : संजय गवारी, आशा शेंगाळे, इंदूबाई लोहकरे.
बारामती (नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला) – राष्ट्रवादी कॉंग्रेस : नीता बारवकर, नीता फरांदे, लीलाबाई गावडे.
मुळशी (सर्वसाधरण प्रवर्ग) – राष्ट्रवादी कॉंग्रेस : कोमल वाशिले, राधिका कोंढरे, पांडुरंग ओझरकर. शिवसेना : विजय केदारी, सचिन साठे.
इंदापूर (नागरिकांचा मागस महिला प्रवर्ग) – कॉंग्रस : पुष्पा रेडके, स्वाती शेंडे. राष्ट्रवादी कॉंग्रेस : शीतल वणवे.
पुरंदर (सर्वसाधरण महिला) – शिवसेना : नलिनी लोळे. कॉंग्रस : सुनीता कोलते, सोनाली यादव.
जुन्नर (नागरिकांचा मागस प्रवर्ग) – राष्ट्रवादी कॉंग्रेस : विशाल तांबे, नंदा बनकर. शिवसेना : जीवन शिंदे, अर्चना माळकर.
मावळ (सर्वसाधणर महिला प्रवर्ग) – भाजप : निकिता घोटकुले. राष्ट्रवादी कॉंग्रेस : राजश्री राऊत.
दौंड (सर्वसाधरण महिला प्रवर्ग) – राष्ट्रवादी कॉंग्रस : हेमलता फडके, आशा शितोळो. भाजप : जयश्री काळे.
शिरूर (सर्वसाधरण महिला प्रवर्ग) – राष्ट्रवादी कॉंग्रस : मोहिनी हरगुडे, सविता पऱ्हाड.
वेल्हे (सर्वसाधरण प्रवर्ग) – दिनकर सरपाले (निश्‍चित).

महाआघाडी देणार एकत्र असल्याचा संदेश?
राज्यात सत्तेसाठी जुळलेले समिकरण स्थानिक पातळीवरही लागू करून जनतेमध्ये आम्ही एकत्र आहोत हा संदेश देण्याची ही चांगली वेळ शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रस पक्षांकडे चालून आली आहे. 13 पंचायत समिती सभापतिपद एकमेकांमध्ये वाटून घेतल्यास वाद होणार नसल्याचाही पर्याय आहे. दरम्यान, पक्षीय बलानुसारच हे पद जाणार असल्याची शक्‍यता असल्याने शक्‍यता असल्याने कोण आघाडीवर राहणार आणि कोणाला उपसभापतिपदावर समाधान मानावे लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नवीन समिकरण स्थानिक इच्छुकांना मान्य होणार का? हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

हवेलीमध्ये सत्ता राष्ट्रवादीची मात्र, सभापतिपद भाजपकडे जाणार
हवेली पंचायत समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असली तरी आरक्षण सोडतीमध्ये सभापतिपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची कोंडी झाली आहे. या पंचायत समितीतून अनुसुचित जाती महिलामध्ये केवळ भाजपच्या फुलाबाई कदम या एकमेवच सदस्य असल्याने त्यांची वर्णी लागणार असल्याने सत्ता राष्ट्रवादीची मात्र सभापतिपद भाजपकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत अजित पवारांकडे सदस्यांनी गाऱ्हाणे मांडले असून ते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.