पंचनामा अहवालाचे काम अंतिम टप्प्यात

कृषी आयुक्‍त : चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान

पुणे – चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी दिली.

सप्टेंबरनंतर राज्यात पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने कांदा, सोयाबीन, कपाशी तसेच तरकारी भाज्या यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्‍टोंबर महिन्यात सुद्धा पाऊस सुरू होता. त्यातच निवडणुकांमुळे पंचनाम्याचे काम खोळंबले होते. दिवाळीनंतर हे काम सुरू होणार होते; पण त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे पंचनाम्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. प्रत्यक्षात 1 नोव्हेंबरपासूनच हे काम सुरू झाले आहे. त्यानंतरही पुन्हा महा’ वादळाचा तडाखा बसल्याने दोन दिवस कामात खंड पडला होता पण, आता पंचनामा करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

याबाबत कृषी आयुक्‍त दिवसे म्हणाले, पंचनामे हे दोन प्रकारे होत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्याचे स्वतंत्र पंचनामे होत आहेत तर, ज्या शेतकऱ्याचा पीकविमा नाही त्यांचे सुद्धा स्वतंत्र पंचनामे होऊन त्यांचा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतर एनडीआरएफ’कडून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास सुरू होईल.

नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पडलेल्या पावसामुळे पंचनामे करण्यात अडचणी आल्या पण, आता सर्व अडचणी दूर झाल्या असून हे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार होऊन त्याबाबतची यादी तयार केली जाईल.
-सुहास दिवसे, राज्याचे कृषी आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.