खंडाळा तालुक्‍यात 67 गावांतील 4625 हेक्‍टरवरील पंचनामे

पंचायत समितीच्या सभेतील माहिती; शिरवळ, लोणंदला स्विपरची नियुक्ती करण्याची मागणी
शिरवळ –
कृषी विभागाच्या वतीने अवकाळी व अतिवृष्टीमुळे खंडाळा तालुक्‍यातील 67 गावांतील 4625 हेक्‍टरवरील 13 हजार 930 बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात या खातेदारांसाठी एक कोटी 80 लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा झाली असून त्याचे वाटप सुरू असल्याची माहिती खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

शिरवळ व लोणंद या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्विपरची जागा रिक्त असल्याने जनतेला अनेकदा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून या ठिकाणी स्विपरची तातडीने नियुक्ती करावी, तसेच याच ठिकाणी सर्व सोयीयुक्त शवागृह निर्माण करण्यात यावे, अशा मागणीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन कै. लक्ष्मणराव भरगुडे- पाटील सभागृहात उपसभापती वंदना धायगुडे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी सदस्य राजेंद्र तांबे, चंद्रकांत यादव, अश्‍विनी पवार, शोभा जाधव, कार्यकारी अभियंता लव्हटे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांसह विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

विविध विभागांचा आढावा घेताना लोकाभिमुख कारभार करण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या. आरोग्य विभागाबाबत पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाचा बेशिस्त व उद्धटपणा यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अन्यथा हेच कार्यालय काही दिवसांत करमणूक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागेल, अशी टीका करीत चंद्रकांत यादव यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर निशाणा साधला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढाव्यावेळी तालुक्‍यातील लोकवस्तीतून जाणाऱ्या मार्गानजीक गटारांची सोय करण्यात आलेली नसून यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन तो रस्ता लगेचच खराब होत आहे, अशा ठिकाणी गटारांची त्वरित निर्मिती करावी. शिरवळ भागातील औद्योगिकरणामध्ये असणाऱ्या मार्गांची रुंदी कमी असल्याने वाहनधारकांना व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा लहान- मोठ्या अपघातांना निमत्रंण मिळत आहे. या रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी संबधित प्रशासनाने सकारात्मक पाउल उचलावे. याचबरोबर लोणंद- शिरवळ व लोणंद- खंडाळा या प्रमुख मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, वाढलेली अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या.

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोर्वे- भादे रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदले. परंतु, वृक्ष लागवड केली का नाही, हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत कामकाजाविषयी सभागृहाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या खंडाळा आगारप्रमुखांच्या कामकाजाबद्दल सामुदायिक नाराजी व्यक्त करण्यात आली. तालुक्‍याच्या शहरी व ग्रामीण मार्गावरील एसटी बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तर शालेय मुलांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बसचे वेळापत्रक बदलून बंद बस पुन्हा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी झाली.

पशुसंवर्धन विभागाने कामकाजादरम्यान लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा, असे सांगण्यात आले. यावेळी तसेच खंडाळा येथील ट्रॉमा केअरची उभारणी तात्काळ करण्यात यावी, यासाठी संबधित विभागांने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सांगण्यात आले. मासिक सर्वसाधारण सभेसाठी अनेक खातेप्रमुख प्रतिनिधींना सभागृहात पाठवून अपुरी माहिती लोकप्रतिनिधीना देतात. अशा अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या. स्वागत गटविकास अधिकारी बिचकुले यांनी केले. आभार उपसभापती वंदना धायगुडे पाटील यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.