नवी दिल्ली – निर्बंधाचा काळ पाहता केंद्र सरकारने सामान्य नागरिक व करदात्यांना विविध कामासाठी लागणाऱ्या कालमर्यादेत वाढ केली आहे. आज जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार आधार कार्ड- पॅन कार्डाशी संलग्न करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड पॅन क्रमांकाशी संलग्न करू शकतील.
कंपन्याकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्त्रोतातील कर कपातीचे फॉर्म 16 अंतर्गतचे प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे प्रमाणपत्र 15 जुलै ऐवजी 31 जुलैपर्यंत देता येणार आहे.
कर वजावटीसाठी निवासी घर खरेदी करण्याचा कालावधीही वाढविण्यात आला आहे.
कर विवाद मिटविण्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत जमा करायच्या पेमेंटसाठीची कालमर्यादा दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आता हे पेमेंट 31 ऑगस्टपर्यंत जमा करता येणार आहे. त्याचबरोबर व्याजासह 31 ऑक्टोबरपर्यंत हे पेमेंट करण्यात करता येईल.
कंपनीने कर्मचाऱ्यांना काव्हीडवर उपचार करण्यासाठी दिलेले पैसे आता करमुक्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्याचा कोव्हीडमुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे दिलेले सानुग्रह अनुदान करमुक्त करण्यात आले आहे.