पालघर: शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना उमेदवारी

– उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
– श्रीनिवास वनगा यांना विधिमंडळात पाठवणार

मुंबई: पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळणार, याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाने जिंकलेला पालघरचा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळाला आहे. मतदारसंघाबरोबरच शिवसेनेने भाजपाचे खासदर राजेंद्र गावीत यांनाही आयात करून त्यांना पालघर मतदारसंघातून उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र, गावित यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना विधिमंडळात पाठविणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी राजेंद्र गावीत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत यानेही शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा देऊन राजेंद्र गावीत तसेच रोहित यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार विवेक पंडित आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघातून खासदार राजेंद्र गावीत हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

अशी युती जगात एखादीच असेल ज्यात जागाही घ्या आणि उमेदवारही घ्या इतके एकमत होत असेल अशी मिश्‍कील टिपणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. गावीत यांची उमेदवारी जाहीर करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पालघर पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास वनगा व त्यांच्या कुटुंबीयांची जबाबादारी शिवसेनेची आहे. श्रीनिवास यांच्या इच्छेनुसार त्यांना विधिमंडळात पाठविणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे ही ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची ओळख आहे. श्रीनिवास वनगा यांनी विधिमंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार त्यांना कोणत्याही मार्गाने विविधमंडळात पाठवणारच, असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

बार्टर नाही पार्टनर…

शिवसेना-भाजपमध्ये बार्टर सिस्टम सुरू आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, युती म्हणून लढत असताना खासदार म्हणून चांगला उमेदवार समोर असताना पुन्हा प्रयोग कशाला करायचा. ज्याप्रमाणे नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर हे भाजपने शिवसेनेचे आमदार घेतले. मागील वेळी धुळ्यामध्ये सुभाष भामरे घेतलेले आहेत. सुरेश प्रभू घेतलेले आहेत. त्यामुळे बार्टर नसले तरी आम्ही पार्टनर आहोत.

आमदार होण्यास इच्छूक – श्रीनिवास वनगा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम दिलं. त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहेच. पण लोकसभा निवडणूक लढवून मोठी उडी घेण्यापेक्षा आधी मतदारसंघात विकासकामं करायची आहेत. म्हणून आमदर होण्यास मी इच्छुक आहे. आमदार म्हणून काम केल्यानंतर भविष्यात नक्कीच लोकसभा लढवेन, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली.

दिलेली संधी सार्थ ठरवेन – राजेंद्र गावीत

नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पालघरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. पालघरमध्ये खासदार म्हणून विकासकामांनाच आपले प्राधान्य राहील. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंर्त्यांनी दिलेली संधी सार्थ ठरवीन, असा विश्वास राजेंद्र गावीत यांनी व्यक्त केला.

https://twitter.com/ShivSena/status/1110501855677898752

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)