कैरो : इस्राईल आणि अमेरिकेबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकल्याची घोषणा पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास यांनी शनिवारी केली. या दोन्ही देशांबरोबरचे संरक्षण सहकार्यासह सर्व संबंध तोडून टाकत असल्याचे त्यांनी जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलला झुकते माप देणारी मध्यपूर्वेसाठीची वादग्रस्त योजना मांडल्यामुळे पॅलेस्टाईनने हा निर्णय घेतला आहे. अब्बास यांच्या घोषणेनंतर प्रत्यक्षात याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट झाले नाही.
पॅलेस्टाईनच्या भूभागावर कब्जा करण्यासाठी इस्त्राईलला जबाबदार धरावे लागेल आणि पॅलेस्टाईन शांततापूर्ण मार्गांचा वापर करून प्रतिकार करेल, असेही ते म्हणाले. जेरुसलेममधील अल-अक्सा मशिद कंपाऊंडवरील फ्लॅशपॉईंटवरून झालेल्या वादाच्या वेळी इस्राईलबरोबरचे सुरक्षा समन्वयाचे संबंध स्थगित करण्याची घोषणा अब्बास यांनी जुलै 2017 मध्ये देखील केली होती. मात्र हे संबंध वर्षभरातच पुन्हा सुरू झाले होते. या कालावधी दरम्यान इस्राईलबरोबर नियमित संपर्क ठेवले होते. असे पॅलेस्टाईन पोलिस प्रमुख म्हणाले.