पालखी सोहळा फलटण नगरीत विसावला

अजय माळवे
सुखा लागी जरी करीसी तळमळ ।। तरि तू पंढरीसी जाय एक वेळ ।। मग तू अवघाची सुखरूप होशी । जन्मोजन्मी चे सुख विसरशी ।।

फलटण –  पांडुरंगाच्या भेटीची आस मनात धरून हरि भजनात दंग होऊन भक्तिरसाची वाट तुडवित माऊलींचा पालखी सोहळा ऐतिहासिक फलटण नगरीत एक दिवस मुक्कामासाठी विसावला. महानुभाव व जैन पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण नगरीत फलटणकरांनी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आणि वारकऱ्यांचे शाही स्वागत केले.

तरडगावकरांचा निरोप घेऊन सकाळी साडेसहा वाजता हा पालखी सोहळा बावीस किलोमीटरची वाट कापण्यासाठी फलटणकडे मार्गस्थ झाला. काटेरी झुडपांच्या गराड्यात रात्री मुक्कामासाठी विसावलेल्या. दिंड्या भल्या पहाटेच जाग्या झाल्या, सकाळच्या कोवळ्या उन्हात एक- एक दिंडी येऊन सोहळ्यात सहभागी होत होती. तरडगावच्या पूर्वेचा माळ ओलांडून काळज येथील दत्त मंदिराच्या रमणीय हिरव्यागार परिसरात विसाव्यासाठी पालखी सोहळा थांबला. भराभर पावले टाकीत वारकरी अंतर कमी करत होते. त्यानंतरच्या वाटचालीत उन्हाची तिरीप वाढली. तहान- भूक विसरून विठूमाउलीचा गजर करीत नाचत गात वारकऱ्यांची वाटचाल सुरू होती.

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।।1।।
लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ।।2।।
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ।।3।।
सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा।।4।।

असे अभंग गात दिंड्यांची न्याहरीच्या ठिकाणाकडे वाटचाल सुरू होती. निंभोरे ओढा येथे न्याहरीसाठी पालखी सोहळा विसावला. दिंड्यांमध्ये स्वयंपाकाची सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या पंगती जेवणासाठी बसत होत्या. उन्हामुळे दिसेल त्या झाडाखाली वारकरी भाविक विसावले होते. तरडगाव येथे उभे रिंगण झाल्याने वारकऱ्यांचा उत्साह वाढला होता. आकाशात येणाऱ्या ढगांकडे पाहत दिंड्यांची वाटचाल सुरू होती. पालखी सोहळ्यासोबत अनेक हौसे-गौसे सहभागी झाले. वारीत सहभागी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.

काटेरी कुंपणातून वाटचाल करीत, पालखी शहराच्या हद्दीत आल्यानंतर फलटण नगर परिषदेच्यावतीने नगराध्यक्षा सौ. नीताताई नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, अधिकारी मुस्ताक महात, नगरसेवक व नगरसेविका यांनी स्वागत केले. पालखी सोहळ्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. हेमाडपंथी शिल्पकलेचा सुंदर अविष्कार असलेल्या राम मंदिर, जबरेश्वर मंदिराशेजारून माऊलींच्या पालखीचा रथ फलटण विमानतळाच्या मैदानावर आला.

पालखी सोहळा मार्गावरील हा सर्वात मोठा पालखी तळ आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान पालखी सोहळा श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाडा येथे येताच नाईक निंबाळकर राजघराण्याच्या वतीने व नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक- निंबाळकर यांनी स्वागत केले. यावेळी नाईक- निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. या तळावर प्रांताधिकारी संतोष जाधव व तहसीलदार हनुमंत पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेतले. सर्व फलटणकर भक्तिमय झाले होते. शुक्रवार दि. 5 जुलै रोजी पालखी सोहळा मुक्कामासाठी बरड येथे जाणार आहे. विडणी येथे विसाव्यासाठी राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.