लखनौ –भारताची अव्वल मानांकित दिव्यांग बॅडमिंटनपटू पलक कोहली हिने पुढील वर्षी होत असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून देशाला पदक जिंकून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे लहानपणापासून मी स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण झाले असले तरीही अद्याप देशाची शान वाढेल अशी कामगिरी सातत्याने करण्याचा प्रयत्न आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, प्रत्येकवेळी त्यातूनच मला अशा संकटांवर मात कशी करायची याचा मार्ग मिळतो. सध्या करोनाचे संकट कायम असल्याने एखाद्या क्रीडा संकुलात सराव करणे शक्य नसल्याने घराजवळच्या एका उद्यानातील जागेवर तात्पुरते बॅडमिंटन कोर्ट तयार केले असून तिथेच सराव करते. हे कोर्ट ऑलिम्पिक दर्जाचे नसले तरीही मानसिकता भक्कम करण्यावर तसेच मूलभूत गोष्टींचा सराव करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे जोव्हा करोनाचा धोका संपुष्टात येईल त्यावेळी अद्ययावत कोर्टवर सराव करताना काहीही अडचण येणार नाही, असे मत पलकने व्यक्त केले.
पॅरालिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेली पलक अन्य सहकारी खेळाडूंसह गौरव खन्ना या राष्ट्रीय प्रशिक्षकांकडे सराव करत होती. मात्र, करोनाचा धोका वाढला व देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने तिला येथे एक घर भाडेतत्वावर घेऊन देण्यात आले आहे. तिथेच जवळ असलेल्या एका उद्यानात तिने बॅडमिंटन कोर्ट उभारले असून रात्रीदेखील सराव करता यावा यासाठी प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली आहे.
रोज दोन वेळा सराव करत आहे. एकदा सूर्यप्रकाशात तर संध्याकाळी प्रकाशझोतात. त्यामुळे ज्या स्पर्धा काही देशांत प्रकाशझोतात होतात त्यासाठी योग्य सराव मिळतो. तसेच शटलवर नजरदेखील बसते. गौरव खन्ना हे सातत्याने माझ्या सरावावर लक्ष ठेवतात व काही चूक झाली तर लगेच निदर्शनास आणून देतात. खरेतर आपल्या खेळात कोणत्या गोष्टी चुकतात यासाठी असे मार्गदर्शन मिळते तेव्हाच त्यातून खेळाडू चुका सुधारण्यावर भर देतो. माझ्यासह जे सहकारी खेळाडू सराव करत होते, त्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या घरीच जावे लागले आहे. त्यांना सरावही करता येत नसून मला ही संधी मिळाली त्यासाठी स्वतःला खूप नशीबवान समजते, असेही पलकने सांगितले.
पलककडून मिळते प्रेरणा…
पलक जन्मापासून दिव्यांग आहे. तिच्या डाव्या हाताची पूर्ण वाढ झालेली नाही. मात्र, तरीही तिने अफाट जिद्दीच्या जोरावर या खेळात आपले नाव कमावले. तिच्याकडून प्रेरणा घेत आज शेकडो दिव्यांग मुले या खेळातच नव्हे तर अन्य खेळातही आज यश मिळवत आहेत. पॅरालिम्पिकपूर्व क्रमवारीत पलकचा समावेश पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहे. पहिले सहा खेळाडू पात्र ठरतात त्यामुळे पलकचा समावेश निश्चित आहे. ती यंदा बाराव्या इयत्तेत शिकत असून पदार्पण केल्यापासून तिने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये 4 पदके पटकावली आहेत.