लाड-पागे कमिटीच्या शिफारशींना पालिकेचा कोलदांडा

16 चतुर्थ श्रेणी पदांच्या भरतीबाबत टाळाटाळ
सातारा – पालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली 16 पदे भरण्याबाबत चार सदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सभागृहात ठराव घेण्यात आला. हा विषय लांबणीवर ठेवण्यातच प्रशासन दंग झाले आहे. लाड-पागे कमिटीच्या शिफारशीनुसार रिक्त पदावर 30 दिवसांच्या आत नेमणुका करणे बंधनकारक आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून त्या होत नसल्याच्या निषेधार्थ आता अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या केबीनसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

संघाचे जिल्हा संघटक गणेश भिसे, विशाल कांबळे, नितीन वायदंडे, राकेश खरात, तेजस कांबळे, गोविंद साळवे, सुशांत कांबळे, नागेश आवळे, रवींद्र खंडझोडे, कल्पना रणदिवे, वैशाली वायदंडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पालिकेची सर्वसाधारण सभा 28 मे रोजी झाली. त्या सभेत विषय पत्रिकेवर 16 रिक्त पदाच्या जागा भरण्यासंदर्भात विषयी चार सदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार भरती प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याचा ठराव बहुमताने सभागृहात मंजूर करण्यात आला. या अनुषंगाने कोणतीही कारवाई पूर्ण करण्यात आली नसून हा विषय लांबणीवर ठेवण्यात प्रशासन दंग झाले आहे.

लाड-पागे कमिटीनुसार आरोग्य कर्मचारी भरती रिक्त पदावर 30 दिवसांच्या आत नेमणूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीसुद्धा गेली दीड वर्षे भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे कामगारांचे आर्थिक, मानसिक, शारिरीक नुकसान होत आहे. रोजगार नसल्याने कुटुंबाची वाताहात होत आहे. आता सहनशक्ती संपली आहे. यामुळे 16 जण आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. तोंडी चर्चेतून 2 दिवसांमध्ये या प्रश्‍नावर मार्ग काढू, असे आश्‍वासन दिले होते. याबाबत चर्चाही झाली. आता दोन दिवसांची मुदत दिली आहे. या प्रश्‍नावर मार्ग काढून सर्वसाधारण सभेमध्ये चार सदस्यीय समितीने दिलेल्या ठरावास पूर्णत्वास न्यावे. कामगार भरती ठराव मंजूरी करण्यासाठी विलंब लावला तर, 11 पासून 16 कर्मचाऱ्यांसह संघटना आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×