कराची : आबिद अलीच्या शानदार दीडशतकी तर शान मसूद, अजहर अली आणि बाबर आझमच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेसमोर कसोटी विजयासाठी ४७६ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाकने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव उपहारापूर्वी १३१ षटकांत ३ बाद ५५५ वर घोषित केला.
Pakistan declare on 555/3, with a lead of 475 💪
Sri Lanka have a huge mountain to climb!#PakvSL pic.twitter.com/Eczl5SROJl
— ICC (@ICC) December 22, 2019
पाकने दुस-या डावात दमदार फलंदाजी करताना ५५५ धावांचा डोंगर उभा केला. दुस-या डावात पाकच्या ४ फलंदाजांनी शानदार शतके ठोकली. सलामीवीर आबिद अलीने २८१ चेंडूत (२१ चौकार व १ षटकार) १७४ धावांची खेळी केली तर शान मसूदने १९८ चेंडूत (७ चौकार व ३ षटकार) १३५ धावांची खेळी केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी २७८ धावांची भागिदारी केली.
त्यानंतर तिस-या क्रमाकांचा फलंदाज अजहर अलीनेसुध्दा १५७ चेंडूत १३ चौकारासह ११८ धावा केल्या. तर बाबर आझमने १३१ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद १०० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून दुस-या डावात लहिरू कुमाराने २ तर लसिथ एम्बुलडेनियाने १ गडी बाद केला.
दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा श्रीलंकेच्या ३ बाद ७९ धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी ३९६ धावांची आवश्यकता आहे. दिमुथ करुणारत्ने १६, कुसल मेंडिस ० तर एंजेलो मैथ्यूज १९ धावांवर बाद झाले आहेत. पाककडून शाहीन अफरीदी, मोहम्मद अब्बास आणि नसीम शाहने एक गडी बाद केला आहे. सध्या खेळपट्टीवर ओशदा फर्नांडो ४३ धावांवर खेळत आहे तर दिनेश चंडीमल नुकताच फलंदाजीसाठी आलेला आहे.