लाहोर – जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या मुद्यावर पाकने आता फेसुबक आणि ट्विटर या कंपनीकडे धाव घेतली आहे. काश्मीर संदर्भातील समर्थनाच्या पार्श्वभूमीवरील संदेश व्हायरल करणारी काही पाकिस्तानमधील युजर्सची अकाउंटस् फेसबुक आणि ट्विटरने रद्द केली आहेत. पाकिस्तानने यावर आक्षेप घेतला आहे.
पाकमधील डॉनच्या वृत्तानुसार, काश्मीरसंदर्भात समर्थन करणारी पाकिस्तानी अकाउंट रद्द करण्याचा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सचे (आयएसपीआर) महानिदेशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी रद्द करण्यात आलेल्या अकाउंटची माहिती देण्यासंदर्भात सोशल मीडिया कंपनींकडे विनंती केली होती.
सोशल मीडियाच्या कंपनीच्या क्षेत्रीय मुख्यालयामध्ये भारतीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे पाक युजर्सची अकाउंट रद्द करण्यात आली आहेत, असा आरोप या संदर्भात पाककडून करण्यात आला होता. पॉलिंटर संस्थेच्या अहवालानुसार, फेसबुकवरील माहितीची पडताळणी करण्याची सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. तर त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक येतो.