लाहोर – दहशतवाद, काश्मीर, भारताच्या विरोधात बोलायचे झाले की पाकिस्तानातील राजकीय नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागते. वर्षानुवर्षे भारताविरोधात फुत्कार सोडून येथील राजकीय पक्षांनी आपली दुकाने थाटली आहे. किंबहुना भारत विरोध हेच यांचे मुख्य भांडवला आहे. असे करून जनतेला काही काळ भुलवता येते. मात्र जेव्हा समस्या जनतेच्या अस्तित्वाच्या मुळावरच उठतात तर ती प्रश्न विचारू लागते. केवळ सामान्य माणसेच नव्हे, तर प्रसिध्द व्यक्तीमत्वांचाही सवालकर्त्यांमध्ये समावेश असतो.
असे पाकिस्तानची दयनीय स्थिती दर्शवणारे व त्या देशाला आरसा दाखविणारे काही बोचरे प्रश्न त्या देशातील प्रख्यात क्रिकेट मोहम्मद हाफीज याने विचारले असून त्यात त्याने पाकिस्तानचे आजी आणि माजी या दोन्ही पंतप्रधानांना टॅग केले आहे. हाफीजने क्रिकेटच्या तीनही प्रकारात पाकिस्तानचे नेतृत्व केले असल्यामुळे तो त्या देशात परिचित चेहरा आहे.
लाहोरमध्ये आज कोणत्याच पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध नाही. कोणत्याच एटीएमध्ये कॅश उपलब्ध नाही. राजकीय निर्णयांची किंमत सामान्य माणसांनी का चुकवावी हा माझा प्रश्न असल्याचे ट्वीट त्याने केले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतच इतरही अनेक राजकीय नेत्यांना त्याने टॅग केले आहे.
क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर असणाऱ्या हाफीजने खेळाच्या तीनही प्रकारांत 12 हजार पेक्षा जास्त धावा तर 250 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.