लाहोर – पाकिस्तानचा अव्वल फलंदाज उमर अकमल याच्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तीन वर्षांची बंदी लावली आहे. क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करणे, सट्टेबाजांशी संपर्क साधुन सामने फिक्स करण्यासाठी प्रयत्न करणे असे आरोप करण्यात आले होते. तो त्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मॅच फिक्सिंगच्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या होत्या. त्यात अकमलचे नाव आले होते. त्यानुसार मंडळाने त्याला निलंबित केले होते व त्याची चौकशी करतानाच त्याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला होता. त्यात त्याने अशा काही व्यक्तींशी चर्चा केली होती की ते सट्टेबाजीत गुंतलेले होते. तसेच तो एका सट्टेबाजालाही भेटल्याचे पुरावे हाती आले होते. पाकिस्तान सुपर लिगला प्रारंभ होण्यापूर्वीच मंडळाने त्याला निलंबित केले होते.
अकमल 29 वर्षांचा असून त्याने इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धेदरम्यानही सट्टेबाजांशी संपर्क साधला होता तसेच पाकिस्तानच्या इंग्लिंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्यावर आरोप झाल्यानंतर त्याला मायदेशी परत पाठविण्यात आले होते.
भ्रष्टाचारी खेळाडूंना जेलमध्ये टाका..
सट्टेबाजी, बुकी, मॅच फिक्सिंग तसेच स्पॉट फिक्सिंग ही क्रिकेटला लागलेली कीड आहे, त्याचा समुळ नायनाट करायचा असेल तर जे खेळाडू दोषी असल्याचे सिद्ध होइल त्यांना सरळ जेलमध्ये टाकले पाहिजे. असे केले तरच हे प्रकार थांबतील. एकाला कठोर शिक्षा केली की बाकी कोणी भविष्यात असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी कसोटीपटू व समालोचक रमीज राजा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.