ICC Champions Trophy 2025 (PCB vs ICC) :- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या 50 षटकांच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यास महसुलाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याबरोबरीने पीसीबीला खटल्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासूनही दूर जाऊ शकतो, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वरिष्ठ प्रशासकाने व्यक्त केले आहे.
आयसीसीच्या वतीने पाकिस्तानकडे आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होते. मात्र, भारताने पाकिस्तानमध्ये आपला संघ पाठविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा घेण्याचे सुचविले होते. मात्र यावर पाकिस्तानकडून अजूनही कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे ऐनवेळी भारताने हायब्रीड मॉडेल पूर्णपणे स्वीकारले नाही तर पीसीबीला या स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेणे शक्य होणार नाही.
आयसीसीच्या वरिष्ठ प्रशासकाने सांगितले की, ‘पाकिस्तानने केवळ आयसीसीसोबत होस्टिंग करारावर स्वाक्षरी केली नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर देशांप्रमाणेच त्यांनी आयसीसीसोबत सदस्यांच्या अनिवार्य सहभाग करारावर (एमपीए) स्वाक्षरी केली आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी एमपीएवर स्वाक्षरी केल्यावरच सदस्य देश आयसीसीच्या स्पर्धांमधून मिळणाऱ्या कमाईचा हिस्सा मिळवण्याचा हक्कदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रॉडकास्टरशी करार
प्रशासकाने सांगितले की, “आयसीसीने सर्वात महत्त्वाची गोष्ट केली आहे की, आयसीसीने सर्व स्पर्धांसाठी ब्रॉडकास्टरशी एक करार केला आहे ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसह, त्याचे सर्व सदस्य देश आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी होतील याची हमी दिली आहे,” अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात, आयसीसीला चॅम्पियन्स करंडक हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्यास संमती मिळविण्यात यश आले. त्यानुसार भारत आपले सामने दुबईत खेळणार आहे. याशिवाय 2027 पर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये ही व्यवस्था अबाधित राहील. मात्र, याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही.
संघटना दाखल करू शकतात खटला
जर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतली तर आयसीसी आणि आयसीसी कार्यकारी मंडळातील इतर 16 सदस्य देश त्यांच्यावर खटला भरू शकतात. ब्रॉडकास्टर देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर खटला दाखल करू शकतो. पाकिस्तान आयोजनातून बाहेर पडल्यास स्पर्धेशी संबंधित सर्वांचेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे प्रशासकाने सांगितले. दरम्यान, पीसीबीला कार्यकारी मंडळाच्या इतर सदस्यांकडून ठोस पाठिंबा मिळाला नसल्याचा खुलासाही प्रशासकाने केला आहे.