सौदी अरेबिया दौऱ्यात “चोर-चोर’च्या घोषणा
दुबई – पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना सौदी अरेबिया दौऱ्यात अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावे लागले आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या कारभाराची सूत्रं सांभाळल्यानंतर शरीफ हे तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत.
पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान गेल्या शुक्रवारी आपल्या पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर सौदी अरेबियाला भेट दिली. एकीकडे पाकिस्तान प्रचंड कर्ज, वाढत्या महागाई आणि अस्थिर वातावरणाशी तोंड देत असताना सौदी अरेबियासोबतचे आर्थिक संबंध वाढविण्याचा प्रयत्नात आहे. मात्र, तिथे त्यांना भलत्याच पाहुणचाराचा सामना करावा लागला आहे. येथील मदिना मशिदीत पोहोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या विरोधात चोर चोर अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
यावेळी शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानचे प्रतिनिधीमंडळही होते. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मदिना मशिदीचं पावित्र्य भंग केल्याप्रकरणी घोषणा देणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेसाठी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री औरंगजेब यांनी इमरान खान यांना जबाबदार ठरवले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यावर ट्विटरवरून नेटकरी निशाणा साधत आहेत.