कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांची घोषणाबाजी
वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अपमानाचे सत्र काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. हे कमी होते की काय म्हणून रविवारी एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांना फजितीला सामोरे जावे लागले.
रविवारी येथील एका ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात इम्रान खान उपस्थितांना संबोधित करणार होते. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी एका बलुचिस्तानी तरुणाने उभे राहून जोराजोरात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र हा प्रकार सुरू असताना इम्रान खान यांनी आपले भाषण थांबवले नाही. अमेरिकेत राहणारे बलुचिस्तानी नागरिक पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांकडून सातत्याने होत असतो.