इस्लामाबाद -पाकिस्तानमधील उच्चपदस्थांना करोनाची बाधा होण्याचे सत्र चालूच आहे. आता त्यामध्ये त्या देशाचे आरोग्य मंत्री डॉ. जाफर मिर्झा यांचाही समावेश झाला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांना करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले. त्यापाठोपाठ मिर्झा यांच्या रूपाने पाकिस्तानच्या आणखी एका केंद्रीय मंत्र्याला त्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून दिल्या जात असलेल्या लढ्यात मिर्झा अग्रभागी राहिले आहेत.
एवढेच नव्हे तर, इम्रान यांचे आरोग्य सेवेतील विशेष सहाय्यक म्हणून ते काम पाहतात. त्यामुळे मिर्झा यांना करोनाची लागण होण्याची बाब पाकिस्तानमधील विदारक चित्र अधोरेखित करणारे ठरले आहे. करोना फैलाव रोखण्यात पाकिस्तानी यंत्रणा असमर्थ ठरत असल्याची टीका होत आहे.
त्या देशात करोना संसर्ग होणाऱ्या राजकीय नेत्यांची आणि डॉक्टरांची संख्या मोठी आहे. काही राजकीय नेत्यांचा करोनाबाधेने मृत्यूही झाला आहे. पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या 2 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे. तो देश बाधित संख्येत जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानी आहे.