इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी त्यांच्या पतींपेक्षाही अधिक श्रीमंत आहेत. या आशयाचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे 30 जून 2020 रोजी आर्थिक वर्ष संपण्याच्या सुमारास जमा झालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या पत्नी नुसरत शाहबाझ यांच्याकडे त्यांचे पती शाहबाझ यांच्यापेक्षा अधिक मालमत्ता आहे. नुसरत यांच्याकडे 230.29 दशलक्ष रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 9 कृषी विषयक मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे लाहोर आणि हजारा येथे प्रत्येकी एक घर देखील आहे. याशिवाय नुसरत यांनी अनेक 76 ठिकाणी मोठी गुंतवणूक देखील केली आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. असे पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणाऱ्या मोठ्या दैनिकाने म्हटले आहे. तर शाहबाझ यांच्याकडे 104.21 दशलक्ष रुपयांची मालमत्ता आहे. एवढेच नाही तर शाहबाझ यांना 141.78 दशलक्ष रुपयांचे देणेही आहे.
शाहबाझ शरीफ यांच्या दुसऱ्या पत्नी तेहमिना दुरानी यांच्याकडेही 5.76 दशलक्ष रुपयांची मालमत्ता आहे, असे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे 2 लाख रुपयांच्या 4 शेळ्या आहेत. त्यांच्याकडे 6 घरे आणि 600 एकरची शेत जमीन आहे. बॅंकेतील खात्यात 60 दशलक्ष रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र पाकिस्तानबाहेर त्यांची कोणतीही मालमत्ता नाही. मात्र त्यांच्या तिसऱ्या पत्नी बुशरा बिबी यांच्याकडे 141.11 दशलक्ष रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची स्वतःची 4 घरे आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याकडे 1.6 अब्ज रुपयांची मालमत्ता आहे. मात्र त्यांची बहुतेक मालमत्ता दुबईमध्येच आहे. त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांची 1.44 अब्ज रुपयांची मालमत्ताही दुबईमध्येच आहे. मात्र आता त्यांनी ती विकून टाकली आहे.