लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफरझा गिलानी यांना देश सोडून जाण्यास लाहोर सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी रात्री तेथील विमानतळावर मनाई केली. गिलानी हे मंगळवारी रात्री दक्षिण कोरियाकडे जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी लाहोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असता त्यांना तेथे अडवण्यात आले. ते इमिग्रेशन काऊंटरला आले असता त्यांना त्यांचे नाव ब्लॅकलिस्टेड लोकांच्या यादीत असल्याने त्यांना विदेशात प्रवास करता येणार नाही असे तेथील अधिकाऱ्यांना त्यांना सांगितले. अंतर्गत मंत्रालयाने हे आदेश दिल्याचे या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
त्यांच्यावरील या कारवाईचा पाकिस्तान पीपल्स पार्टीने तीव्र निषेध केला आहे. गिलानी यांच्या विरोधात जे जे खटले सुरू आहेत त्या प्रत्येक खटल्यात ते उपस्थित राहिले आहेत. ते देशाबाहेर पळून चालले नव्हते असे असताना त्यांच्यावर ही करण्यात आलेली मनाई बेकायदेशीर आहे असे या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी केवळ राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याच्या इराद्यानेच आपले नाव नो फ्लाय लिस्ट मध्ये टाकले आहे असे स्वता गिलानी यांनी म्हटले आहे.
माझे नाव ब्लॅकलिस्टच्या यादीत आहे याची कल्पना सरकारने आपल्याला आधी द्यायला हवी होती त्यांनी हे गुप्तपणे का केले ते मला समजले नाही असे ते म्हणाले. काही जाहीरात कंपन्यांना सरकारी जाहीरातींची कंत्राटे त्यांनी बेकायदेशीरपणे दिली या आरोपासह त्यांच्यावर तेथे भ्रष्टाचाराचे काही खटले नव्याने दाखल करण्यात आले आहेत असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.