इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने जुलै महिन्यापर्यंत पेट्रोलवरील अनुदान रद्द केले नाही, तर पाकिसतान दिवाळखोर होईल, असा इशारा पाकिस्तानचे अर्थ मंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी दिला आहे.
देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ नये यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे आपण पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. जर पेट्रोल उत्पादनांवरील अनुदान रद्द केले गेले नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पेट्रोल उत्पादनांवरील अनुदान रद्द करण्याची सूचना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्तेवरून पायउतार झालेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नाणेनिधीबरोबर कोणताही चांगला व्यवहार केला नाही. असा आरोपही इस्माईल यांनी केला. देशात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अब्जावधी डॉलरच्या मदतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारला गेल्या महिन्यात पेट्रोलच्या किंमती प्रती लीटर 60 रुपये इतक्या प्रचंड प्रमाणात वाढवाव्या लागल्या होत्या.
देशाच्या अर्थसंकल्पानंतर नाणेनिधीबरोबरच्या व्यवहारातील काही अडथळे दूर होतील असा अंदाज होता. मात्र वैयक्तिक आयकरासंदर्भात नाणेनिधीने ज्या उपाय योजना सुचवल्या होत्या, त्याची अंमलबजावणी सरकारने अर्थसंकल्पामध्ये केली नसल्याने नाणेनिधी अजूनही पाक सरकारवर नाराज आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या तरी आर्थिक आणीबाणी नाही. सरकारने पेट्रोलची दरवाढ केलेली असल्याचे मिफ्ताह गेल्या आठवड्यातच म्हणाले होते. मात्र आता अनुदान रद्द केले नाही, तर नाणेनिधीकडून मदत दिली जाणार नाही. अशा अवस्थेत देशापुढे मोठे संकट उभे राहू शकते, असे ते म्हणाले.