पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचा राजीनामा

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अब्जावधी डॉलरचे अर्थसहाय्याचे पॅकेज मिळवण्यासाठी वाटाघाटी जोरात सुरू असतानाच पाकिस्तानचे अर्थमंत्री असाद उमर यांनी गुरुवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशापुढील आर्थिक संकट हाताळण्यात अपयश आल्याच्या टीकेमुळे उमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठीच्या आर्थिक पॅकेजबाबतची अंतिम टप्प्यातली चर्चा करण्यासाठी उमर नुकतेच अमेरिकेमध्ये गेले होते. तेथून ते परत आले आणि त्यानंतर पाकिस्तानमधील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले. उमर यांच्याकडून अर्थमंत्रालय काढून घेण्यात आले आणि त्यांना उर्जा मंत्रालय देण्यात आले. मात्र त्यांनी कोणतेही मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

उमर हे पंतप्रधान इम्रान खान यांचे अतिशय निकटचे मानले जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी काही अवघड निर्णय घेणे आवश्‍यक होते. ते आपण घेतले. मात्र तरिही आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे उमर यांनी सांगितले. आपल्या जागेवरील नवीन अर्थमंत्री अर्थव्यवस्था स्थिर करण्यात यशस्वी होतील, असा विश्‍वास उमर यांनी व्यक्‍त केला आहे. आपल्याला अर्थमंत्रीपदावरून हटवण्यामागे काही कारस्थान असल्याच्या शक्‍यतेवर उमर यांनी सूचक मौन बाळगले आहे.

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 8 अब्ज डॉलरचे पॅकेज मागितले आहे. पाकिस्तानला आतापर्यंत चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिराती या मित्र देशांकडून 9.1 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.