इस्लामाबाद – भारतात एकीकडे करोना विरोधी लस विकसित होउन आता पहिल्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असताना प्रत्येक बाबतींत भारताशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करणारा आणि असूया बाळगणारा पाकिस्तान मात्र लसीसाठी आता चीनकडे आशाळभूत नजरेने पाहातो आहे.
दक्षिण आशियात करोना लसीकरण करणारा भारत पहिला देश ठरला आहे. अद्याप या भागातील एकाही देशाला कोणती लस उपलब्ध झालेली नाही. आमच्या शेजारी देशांना मदत करण्यास आमचे प्राधान्य असेल असे भारताने जाहीर केले आहे. त्यानुसार श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश या देशांना भारताकडून मदत केली जाउ शकते. मात्र भारताला कायम पाण्यात पाहणारा आणि कुरापती काढणारा पाकिस्तान आपल्या मस्तवालपणामुळे लसीसाठी पूर्णत: चीनवरच अवलंबून असल्याचे दिसून येते आहे.
चीनची सायनोफार्म ही लस येणार आहे. मात्र या लसीचे निष्कर्ष अद्याप जाहीर व्हायचे आहे. त्यामुळे त्या देशाने लसीकरणाचे निर्देश अद्याप दिलेले नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याकरता तिष्ठत राहावे लागणार आहे. चीनच्या लसीचे चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र निष्कर्ष आणि परवानगीला कदाचित फेब्रुवारी अथवा मार्च महिना उजाडणार आहे. असे असले तरी फ्रेबुवारीच्या मध्यापर्यंत लसीचा पहिला हप्ता आम्हाला चीनकडून प्राप्त होईल असा दावा पाकिस्तानडून केला जातो आहे.
पाकिस्तानचे प्रभारी आरोग्य मंत्री फैझल सुलतान यांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी महिन्यात लसीचा पहिला हप्ता त्यांना प्राप्त्त होणार आहे. त्यानंतर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन योध्दा आणि ज्येष्ठ नागरिक यांना लस देण्यास प्राधान्य असेल असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र पाकिस्तानची सध्याची खस्ता झालेली आर्थिक स्थिती पाहता देशातील प्रत्येक नागरिकाला ते लस देउ शकतील हा खरा प्रश्न आहे.
प्रत्येक राष्ट्रांनी लसीच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. असे असताना तद्दन व्यायसायिक असलेला चीन पाकिस्तानला फुकटात लस देईल याची सूतराम शक्यता नाही. मलेशियासोबत करार केल्याप्रमाणे रक्कम दिली नाही, म्हणून पाकिस्तानला दिलेल्या विमानातून चक्क प्रवाशांना खाली उतरवून विमान जप्त करण्यात आल्याची घटना कालच घडली आहे.
त्या पार्श्वभूमीवर दिवाळखोर पाकिस्तान लसीचे मूल्या चीनला कसे चुकविणारा हा प्रश्नच आहे. समजा लस खरेदी करायची म्हटलेच तर पाकिस्तानच्या चीनच्या कर्जाच्या सापळ्यात आणखी आतपर्यंत फसत जाणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे.