अमृतसर- पाकिस्तानस्थित खलिस्थानवादी पंजाबमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक विक्रम जीत दुग्गल यांनी दिली आहे. “ऑपरेशन ब्लू स्टार’च्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने “खलिस्थान लिबरेशन फ्रंट’चा म्होरक्या हरमीत सिंग उर्फ हॅपी पीएचडी पंजाबमध्ये घातपाताच्या घटना घडवण्याच्या प्रयत्नात आहे.
त्यासाठी तो पाकिस्तानातून सोशल मिडीयावरून आणि अन्य माध्यमातून स्थानिक युवकांना भडकावत आहे.
हॅपी हा अमली पदार्थांच्या आणि अन्य तस्करीच्या रॅकेटमध्येही सहभागी आहे. “ऑपरेशन ब्लू स्टार’च्या स्मरणार्थ पंजाबमध्ये शांतता आणि सौहार्द नष्ट करण्यासाठी काही मोठ्या घातपाताच्या घटना घडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असे दुग्गल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जिवंत ग्रेनेड, काही खलिस्थानवादी कागदपत्रे, मोबाईल आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त केले होते. त्यातून खलिस्थानवाद्यांकडून घतपात होण्याचा कट उघड झाला होता. दोन संशयितांकडून हे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते.
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात लपून बसलेल्या खलिस्थानवादी जर्नेल सिंग भिंद्रेनवाले आणि त्याच्या समर्थकांच्याविरोधात जून 1984 मध्ये लष्कराने “ऑपरेशन ब्लू स्टार’केले होते.