कराची – लाहोरमधील एका मॉडेलची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. नायब नदीम, वय 29 असे या मॉडेलचे नाव असून ती डिफेंस परिसरात वास्तव्यास होती. पोलिसांनी राहत्या घरातून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
या घटनेप्रकरणी नायबच्या भाऊ मोहम्मद अली याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. याबाबत माहिती पाकमधील डॉन वृत्तपत्रामधून देण्यात आली आहे.
नायबचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र शवविच्छेदन रिपोर्ट समोर आल्यानंतरच घटनेचा खुलासा होऊ शकेल असी माहिती पोलिसांनी दिली आहे. नायब नदीम हिचे लग्न झालेले नव्हते आणि घरात ती एकटीच राहात होती.
नायबचा भाऊ मोहम्मद अली याने सांगितले की, 9 जुलै रोजी मध्यरात्री तो आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. यावेळी नायबचा मृत्यू झाला असून ती जमिनीवर कोसळलेली होती. तिच्या मानेवर जखमा होत्या. अलीने म्हणाला की नायबच्या बाथरुमची खिडकी तुटलेली होती. यामुळे आरोपी याच मार्गाने घरात घुसल्याचा अंदाज आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे, की अली नेहमीच आपल्या बहिणीची चौकशी कऱण्यासाठी तिच्या घरी येत-जात असे.