पाकिस्तानी मंत्र्यांची एलओसीला भेट

काश्‍मिरी जनतेविषयीच्या खोट्या प्रेमाचा दिखावा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी आणि संरक्षण मंत्री परवेझ खट्टक यांनी सोमवारी नियंत्रण रेषेला (एलओसी) भेट दिली. काश्‍मिरी जनतेविषयीच्या खोट्या प्रेमाचा दिखावा करण्यासाठी ती भेट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

भारताने धडक पाऊल उचलताना मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्‍मीरवर कायम वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. त्यातून भारताकडून काश्‍मिरी जनतेवर अन्याय केला जात असल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे. आता जम्मू-काश्‍मीरविषयीच्या निर्णयाला एक वर्ष होत असतानाच पाकिस्तानी मंत्र्यांनी एलओसीला भेट दिली.

त्याआधी कुरेशी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करून काश्‍मिरी जनतेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एलओसीला भेट देत असल्याचे म्हटले. जम्मू-काश्‍मीरबाबतचा निर्णय भारताने मागे घ्यावा अशी भूमिका घेत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा थयथयाट केला. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला प्रतिसाद मिळाला नाही.

जम्मू-काश्‍मीरविषयीचा निर्णय ही आमची अंतर्गत बाब असल्याची ठाम आणि रास्त भूमिका भारताकडून घेण्यात आली. ती आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य असल्याचे सूचित झाले आहे. जम्मू-काश्‍मीर हा आमचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. वास्तव स्वीकारून पाकिस्तानने आमच्या विरोधातील खोटा प्रचार थांबवावा, असे भारताने याआधी अनेकदा त्या देशाला ठणकावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.