BSFच्या गोळीबारात पाकिस्तानी घुसखोर ठार

जम्मू – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात सोमवारी एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. ती घटना जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत घडली.

सीमेलगतच्या नाक्‍यावर तैनात असलेल्या बीएसएफच्या सतर्क जवानांनी वेळीच संशयास्पद हालचाली हेरल्या. एक व्यक्ती पाकिस्तानातून भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना आढळले. जवानांनी घुसखोराला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत घुसखोर पुढे सरकत राहिला.

त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये घुसखोर मारला गेला. सांबामध्ये बीएसएफ जवानांनी रविवारी 150 मीटर लांबीचे भूमिगत भुयार शोधले. त्या भुयारातून अलिकडेच जैश-ए-महंमदचे चार पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसल्याचा अंदाज आहे. घुसखोरी केलेले ते सर्व दहशतवादी पाच दिवसांपूर्वी नगरोटात झालेल्या चकमकीत मारले गेले.

त्या घटनेमुळे जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक निवडणुकांत अडथळे आणण्याचा जैशचा कट उघडकीस आला. त्यामुळे घुसखोरी रोखण्याच्या उद्देशातून भारतीय सुरक्षा दले आणखीच सतर्क झाली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.