जम्मू – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सोमवारी केलेल्या कारवाईत एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. ही घटना जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घडली. एस.एम.पुरा सीमा नाक्याजवळ तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाल हेरली. एक व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे जवानांच्या ध्यानात आले. त्यांनी घुसखोराला शरण येण्याचे आवाहन केले.
मात्र, घुसखोराने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये घुसखोर मारला गेला. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून वारंवार केला जातो. घुसखोरीचे ते डाव उधळण्यासाठी भारतीय जवान नेहमीच सज्ज आणि सतर्क असतात. त्यामुळे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असणारे अनेक दहशतवादी मारले जातात.