जम्मू – एकीकडे भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती असताना दुसरीकडे पाकिस्तानी आगळिकीही चालू आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी उल्लंघनाचे सत्र कायम ठेवत शनिवारी भारतीय हद्दीतील चार क्षेत्रांत मारा केला. त्यातील एका घटनेत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद, तर दोघे जखमी झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा भडीमार केला. त्या माऱ्याचे लक्ष्य जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यातील तीन ठिकाणे ठरली. पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम क्षेत्रातही मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले. त्यातील एकाचे निधन झाले. जखमी जवानांना उपचारासाठी लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पाकिस्तानी आगळिकींना भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये पाकिस्तानी बाजूची हानी झाली असण्याची शक्यता आहे. सातत्याने शस्त्रसंधी भंग करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना जबर प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यामध्ये मोठा फटका बसत असूनही पाकिस्तान धडा घेताना दिसत नाही.