इस्लामाबाद – ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली एका पाकिस्तानी महिलेला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेने व्हॉट्सअपवरून ईशनिंदा करणारा संदेश पाठवला होता. ज्या व्यक्तीला हा संदेश पाठवण्यात आला, त्याने 2020मध्ये तक्रार केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.
पाकिस्तानात धार्मिक भावना दुखावणे आणि धर्माविषयी कुठलेही अपशब्द काढणे, हा गुन्हा मानला जातो. अशा प्रकारांमुळे धार्मिक भावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे गृहित धरत पाकिस्तानमध्ये आरोपांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद केली आहे.
रावळपिंडी येथील अनिक्वा अतिक नावाच्या महिलेने तिच्या मित्राला व्हॉट्सअपवरून एक संदेश पाठवला होता. त्यात मोहम्मद यांची खिल्ली उडवण्यात आल्याचे दिसत होते. या गोष्टीचा तिच्या मित्राला राग आला आणि त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मे 2020 मध्ये अनिक्वाला पोलिसांनी अटक केली होती. व्हॉट्सअपवरून पाठवलेल्या एका कॅरिकॅचरमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनिक्वाच्या मित्राने केला होता. त्यानंतर वर्षभर चाललेल्या या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.
न्यायालयाने अनिक्वाला मृत्यूदंडाची शिक्षा आणि त्याशिवाय 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याचाच अर्थ अगोदर तिला 10 वर्ष तुरुंगात राहावे लागेल आणि त्यानंतर तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.