#CWC19 : विश्वचषक स्पर्धेत आज ‘पाकिस्तान-द.आफ्रिका’ आमनेसामने

अस्तित्त्व राखण्यासाठी पाकिस्तानची परीक्षा तर आफ्रिकेसाठी विजय अनिवार्य

स्थळ- लॉर्डस मैदान, लंडन
वेळ दु. 3 वाजता

लंडन – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान संघ हा कडवट टीकेचा धनी झाला आहे. उर्वरित प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना आज दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागणार आहे. स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी पाकिस्तानप्रमाणेच आफ्रिकेलाही हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. साहजिकच हा सामना चुरशीने खेळला जाईल अशी अपेक्षा आहे.

भारताविरूद्धचा पराभव हा पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी जिव्हारी बसणारा असतो. त्यातच त्यांचे खेळाडू या सामन्याचे आदल्या दिवशी हॉटेलमध्ये मौजमस्ती करायला गेले असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी खेळाडूंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या खेळाडूंवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे. या स्पर्धेत त्यांचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिक याने सपशेल निराशा केली आहे. या विश्‍वचषक स्पर्धेंनंतर एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीतून तो निवृत्त होणार आहे. त्याला आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. या स्पर्धेत मोहम्मद अमीर हा त्यांच्यासाठी एकांडी शिलेदार ठरला आहे. त्याने आतापर्यंत गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे.

पाकिस्तानपेक्षाही आफ्रिकेची कथा वेगळी नाही. त्यांना आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भक्कम क्षेत्ररक्षणाबाबत ख्यातनाम असलेल्या आफ्रिकेच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण करीत न्यूझीलंडविरूद्ध हातातोंडाशी आलेली विजयाची संधी घालविली होती. अर्थात त्यांच्या या चुकांचा फायदा घेत कर्णधार केन विल्यमसन याने शतक टोलवित न्यूझीलंडचा विजय साकार केला होता.

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्‌वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.

Leave A Reply

Your email address will not be published.