#CWC19 : विश्वचषकात आज ‘पाकिस्तान-न्यूझीलंड’ आमनेसामने

-आव्हान राखण्यासाठी आज पाकिस्तानची कसोटी
-न्यूझीलंडला उपांत्य फेरीचे वेध

बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरूद्ध आज येथे होणाऱ्या लढतीत विजय अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडलादेखील बाद फेरीतील स्थान बळकट होण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे.

स्थळ- एजबॅस्टन, बर्मिंगहॅम,
वेळ-दु. 3 वा.

भारताकडून सपशेल धुव्वा उडाल्यानंतर पाकिस्तानने आफ्रिकेवरील विजयामुळे आपली धुगधुगी कायम राखली आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी हा विजय प्रतिष्ठा टिकविण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासह सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीनेच ते सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. मोहम्मद आमीर याने 15 विकेट्‌स घेत गोलंदाजांमध्ये आघाडीस्थान घेतले आहे. त्याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य गोलंदाजांना अपेक्षेएवढे यश मिळालेले नाही. शदाब खान व वहाब रियाझ यांनी आफ्रिकेविरूद्ध प्रत्येकी तीन गडी बाद केले असले तरीही अन्य सामन्यांमध्ये त्यांनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही. बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल तसेच कर्णधार सर्फराज अहमद यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. क्षेत्ररक्षणात पाकिस्तानला सुधारणा करण्याची गरज आहे.

पाकिस्तानच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वच आघाड्यांवर सातत्य दाखविले आहे. कर्णधार केन विल्यमसन याने या स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके ठोकली आहेत. त्याच्याबरोबरच रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्यावरही त्यांची भिस्त आहे. सलामीस मार्टिन गप्तील याच्याकडून भक्कम पाया अपेक्षित आहे. ट्रेंट बोल्ट व लॉकी फर्ग्युसन यांनी आतापर्यंत प्रभावी मारा केला आहे. त्यांच्याप्रमाणेच जेम्स नीशाम व ईश सोधी यांच्याकडून अचूक मारा अपेक्षित आहे. षटकांचा वेग राखण्याचेच त्यांच्यापुढे आव्हान आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल त्यांना आर्थिक दंडाच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

पाकिस्तान – सर्फराज अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

Leave A Reply

Your email address will not be published.