वाराणसी – ज्ञानव्यापी मशिद- शृंगार गौरी प्रकरणातील पाच प्रमुख अर्जदारांपैकी एका महिलेच्या पतीला पाकिस्तानातून धमकी मिळाली आहे. या संदर्भात न्यायाप्रविष्ट असलेली याचिका मागे घेण्याची धमकी देण्यात आली आहे.
वाराणसीतील विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या ज्ञानव्यापी मशिदीच्या मागील बाजूला असलेल्या शृंगार गौरीच्या निययमित पूजेची परवानगी मिळावी, यासाठी पाच महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापैकी एक लक्ष्मी देवी यांचे पती सोहन लाल आर्य यांना पाकिस्तानातून आलेल्या फोनद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य तीन अर्जदार महिला वाराणसीतीलच आहेत. तर एक अर्जदार महिला दिल्लीतील आहे.
सोहन लाल आर्य यांना मिळालेल्या धमकीसंदर्भात लक्ष पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 19 मार्च रोजी देखील अशाच प्रकारे धमकीचा फोन आला होता. त्याबद्दलही आपण अधिकाऱ्यांना कळवले असल्याचे आर्य यांनी सांगितले आहे. आपण कोणत्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे धमकी देणाऱ्या व्यक्तीला सांगितल्याचेही ते म्हणाले. आर्य यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.