दहश्‍तावादाचे केंद्रबिंदू का झाल्याचे आत्मपरीक्षण पकिस्तनाने करावे- संयुक्‍त राष्ट्रामध्ये भारताने सुनावले

 

 

संयुक्‍त राष्ट्र- जगभरात दहशतवादाचा केंद्रबिंदू आणि दहशतवाद्यांसाठीचे सुरक्षित आश्रयाचे ठिकाण पाकिस्तान का ठरला, याबाबत पाकिस्ताननेच आत्मपरीक्षण करायला पाहिजे, अशा शब्दात भारतीय प्रतिनिधीनी पाकिस्तानला सुनावले. संयुक्‍त राष्ट्रामध्ये होत असलेल्या “दहशतवाद विरोधी सप्ताहा’चा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विषयीच्या एका वेबिनारमध्ये महावीर सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधीमंडळाने हा मुद्दा उपस्थित केला.

“करोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी सर्व जग एकवटले असताना सीमेपलिकडे दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान मात्र भारताविरोधात काल्पनिक, मत्सर, द्वेषभावना पसरवणारे आरोप करण्यात आणि भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्यातच गुंतला आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कायमस्वरुपी, ठाम आणि अपरिवर्तनीय कारवाई करावी, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला समज द्यायला हवी. दहशतवादाचे केंद्रबिंदू का झाल्याचे आत्मपरीक्षण पाकिस्तानने करायला हवे.’ असे सिंघवी म्हणाले.

जम्मू काश्‍मीरसह भारताच्या अंतर्गत धोरणात पाकिस्तानकडून हस्तक्षेप केला जातो आहे. जम्मू काश्‍मीरच्या संदर्भात चुकीच्या आणि चिथावणीखोर धारणा प्रस्तुत करत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. भारताविरोधातील स्वातंत्र्ययुद्ध म्हणून दहशतवाद्यांना लष्करी, आर्थिक, साधनांचे सहकार्यही पुरवत आहे. जर पाकिस्तानला अधिक घातक दहशतवादाच्या विषाणूचा गांभीर्याने सामना करायचा असेल,तर हे विभाजनवादी धोरण सोडून द्यायला हवे, असेही सिंघवी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून मानवी हक्कांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि जम्मू काश्‍मीरच्या अवैधरित्या बळकावलेल्या भागाबाबत मात्र कानाडोळाच केला जातो. धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्यांकांबाबत भेदभावच केला जातो. अहमददीया, ख्रिश्‍चन, हिंदू, शीखांचे बळजबरीने धर्मांतर केले जाते. त्यामुळे भारताकडे बोट दाखवताना पाकिस्तानने आगोदर स्वतःकडे चार बोटे असल्याचे ध्यानात घ्यावे, असेही सिंघवी म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.