पाकिस्तानने एलओसीलगत पाठवले आणखी सैनिक

भारतीय लष्करप्रमुखांनी काढले किरकोळीत

नवी दिल्ली  -भारताने जम्मू-काश्‍मीरसंदर्भात उचललेल्या धडक पाऊलामुळे अस्वस्थ बनलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत आणखी सैनिक पाठवले आहेत. तसेच, पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या तोफाही एलओसीलगत हलवल्या जात आहेत. मात्र, भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ती घडामोड किरकोळीत काढली आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींविषयीचा प्रश्‍न पत्रकारांनी मंगळवारी येथे रावत यांना विचारला. त्यावर ती नियमित स्वरूपाची बाब आहे. त्याविषयी आपण चिंता करायची गरज नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

एलओसीलगतच्या कुठल्याही सुरक्षाविषयक आव्हानाचा मुकाबला करण्यास भारतीय सुरक्षा दले सज्ज आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आगामी काळात एलओसीलगत संघर्षाच्या स्थितीत वाढ होईल का, या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल रावत यांनी ते पाकिस्तानने ठरवायचे आहे, असे म्हटले.

जम्मू-काश्‍मीरबाबतच्या भारताच्या पाऊलामुळे पाकिस्तानकडून दु:साहस केले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. काश्‍मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणे, दहशतवादी हल्ला घडवणे यासारखी नापाक कृत्येही केली जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांना नापाक मनसुबे उधळण्यासाठी सतर्क आणि सज्ज ठेवण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.