इस्लामाबाद – अमेरिकेतील पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येच्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात असलेला अल कायदाचा दहशतवादी अहमद ओमर सईद शेख आणि त्याच्या 3 साथीदारांच्या सुटकेला विरोध करणारी पाकिस्तान सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या चौघांच्या मुक्ततेच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. या मारेकऱ्यांच्या सुटकेच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून जोरदार टीका झाल्यावर या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला होता.
दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द करण्याची मागणी जरी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असली तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख आणि त्याचे साथीदार फहाद नसीम, शेख अदिल आणि सलमान साकीब यांची हंगामी कोठडीची मुदत न्यायालयाने एका दिवसाने वाढवली आहे. सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सरकारचे मत ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने ही मुदत वाढवली आहे.
मारेकऱ्यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय सिंध उच्च न्यायालयाने दिला होता. तो निर्णय रद्द करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. तसेच या निर्णयाचा फेरविचार घेण्याची मागणी सिंध सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात केली होती.