ढाका: आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू देव-देवतांचा अपमान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता अशा प्रकारची आणखी एक घटना भारताच्या शेजारील राष्ट असणाऱ्या बांगलादेशात घडली आहे.
बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ६ मंदिरांना कट्टरवाद्यांनी लक्ष्य करून मोठी तोडफोड केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यात सुमारे ५० हून अधिक मूर्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकापुरा आणि गोवरा या गावात अचानक शेकडो कट्टरपंथीय घुसत या परिसरातील ६ हिंदू मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत ५० हून अधिक मूर्त्यांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या गावांमधील ५७ हून अधिक हिंदू घरांमध्ये घुसून मोठी लूट केल्याचे सांगितले जात आहे. या भागातील दुकानेही लुटून नेली असून, या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ६ ऑगस्ट २०२१ रोजी हा वाद सुरू झाला. शुक्रवारी नमाज पठणावेळी कीर्तन करण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, या दोन गटातील तणाव दंगलीचे स्वरुप धारण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, असे म्हटले जात असून, या घटनेला स्थानिक पातळी तसेच आकाशवाणीने दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.
विशेष बाब म्हणजे बांगलादेशमधील स्थानिक मीडियामध्ये याबाबत उल्लेखही करण्यात आला नाही. तसेच पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत स्थानिक हिंदू संघटनांनी या घटनेची निंदा केली आहे. दुसरीकडे भारतातील विश्व हिंदू परिषदेकडून या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय संघटनांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आले आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.