अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा दावा
काबुल : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा भारताव्यतिरीक्त आणखी एका देशाने जगासमोर आणला आहे. पाकिस्तान इसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा दावा अफगानिस्तानने केला आहे. येत्या 28 सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान इसिसच्या दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यासाठीचे सबळ पुरावे अफगाणिस्तानकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि माजी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी असणारे अमरुल्लाह सालेह यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. अमरुल्लाह यांनी यावेळी काबुलमध्ये नुकतेच एका इसिसच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता या सर्व गोष्टी समोर आल्या असल्याचे त्यांनी म्हटले. दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्र पुरवते याचे सबळ पुरावेदेखील आमच्याकडे आहेत असे सालेह यांनी म्हटले. तसेच भारताने रद्द केलेले कलम 370 चेही सालेह यांनी समर्थन केले आहे.