इस्लामाबाद : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्याशी चर्चा करण्यास आपला पक्ष तयार असल्याचे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी इम्रान खान यांची चर्चेची तयारी असल्यास आपण त्यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इम्रान खान चर्चेला तयार असल्याचे बोलले जाते आहे. जर हे खरे असेल, तर ही एक सकारात्मक बाब आहे. असे पीपीपीचे नेते खुर्शिद शाह यांनी देखील बलुचिस्तानची राधानी क्वेट्टामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी नेहमीच चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. याचर्चेमध्ये पीपीपी सकारात्मक भूमिका बजावू शकते. इम्रान खान यांच्याशी चर्चा झाल्यास त्याचे आपण स्वागतच करू असेही शाह म्हणाले. पीटीआयने सत्तारुढ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज गटाविरोधात कठोर भूमिका घेतली असतानाच पीपीपीने चर्चेची तयारी दाखवली आहे. पीपीपीसह मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान आणि अन्य छोट्या पक्षांनी सत्तेमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पीएमएल-एनला पाठिंबा दिला आहे. पीपीपी आणि पीएमएल-एनमध्ये अलिकडेच जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. पीएमएल-एनने अर्थसंकल्प आणि निधी वाटपाबाबत पीपीपीच्या सर्व मागण्या मान्य करायची तयारीही दाखवली आहे.
इम्रान खान यांच्याविरोधात २०२२ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणून त्यांचे सरकार पाडले गेल्यापासून पीटीआयने पीएमएल-एन आणि पीपीपीच्या सरकारला जोरदार विरोध केला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकांनंतर पीपीपी आणि पीएमएल-एनने मिळून आघाडी सरकार स्थापन केले. तेंव्हापासून हा विरोध अधिकच तीव्र झाला आहे.पीटीआयबरोबर समझोता करण्यासाठी देशातील विविध सामाजिक आणि राजकीय गटांनी आग्रह धरला आहे. इम्रान खान यांनी मात्र चर्चेचे प्रस्ताव फेटाळले होते. सरकारऐवजी लष्कराशी चर्चा करण्याची आपली ईच्छा असल्याचे ते म्हणाले होते.
मात्र गेल्या महिन्यात पीटीआयचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर यांनी सरकारशी चर्चेला इम्रान खान तयार असल्याचे म्हटले होते. त्याच प्रमाणे खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर आणि इम्रान खान यांच्या भगिनी अलिमा खान यांनीही चर्चेबाबत सकारात्मक भाष्य केले होते. सरकारनेही इम्रान खान यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र पीटीआय आणि जमात ए इस्लामीने वाढीव वीज दर आणि करांविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने बिलावल भुट्टो यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.