पाकिस्तानला हवंय जवळपास 4 अब्ज डॉलर्सचे कर्ज

इस्लामाबाद  – आर्थिकदृष्ट्या आधीपासूनच बेजार असलेला पाकिस्तान करोना उद्रेकामुळे आणखीच बेहाल झाला आहे. त्या देशापुढील आर्थिक पेच आणखीच गंभीर बनला आहे. त्यातून त्या देशाने सुमारे 4 अब्ज डॉलर्सचे कर्ज उपलब्ध करण्याचे साकडे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांना घातले आहे.

पाकिस्तानात वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या अकराशेहून अधिक झाली आहे. त्यातील 8 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. आधीच आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पाकिस्तानला करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्यातून त्या देशावर जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि आशियाई विकास बॅंकेपुढे (एडीबी) हात पसरण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानच्या चारही प्रांतांमध्ये करोना फैलावला आहे. त्यामुळे प्रांतिक सरकारांनी अंशत: लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संपूर्ण लॉकडाऊनला अनुकूल नाहीत. संपूर्ण लॉकडाऊन केल्यास गरिबांचे आणि रोजंदारीवर जगणाऱ्यांचे हाल होतील, अशी भूमिका ते सातत्याने मांडत आहेत. काही दिवसांपूर्वी इराणला गेलेले यात्रेकरू पाकिस्तानला परतले. त्यानंतर पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली. इराणमध्ये करोनाने मोठा कहर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.