#CWC19 : न्यूझीलंडचे पाकिस्तानसमोर 238 धावांचे लक्ष्य

बर्मिंगहॅम – सुरूवातीच्या फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर जिमी नीशम आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 238 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 237 धावा केल्या आहे.

न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात खराब झाली. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. सलामीवीर मार्टिन गप्टिल याला मोहम्मद अमिर याने 5 तर कॉलिन मुनरो याला शाहीन अफरीदी याने 12 धावांवर बाद करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रॉस टेलर 3 आणि टॉम लाथम हा 1 धावांवर बाद झाला. केन विलियमसन याने 41 धावा करत न्यूझीलंडचा डाव सावरला. केन विलियमसन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 83 अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या जिमी नीशम याने नाबाद 97 आणि कॉलिन डी ग्रैंडहोम याने 64 धावा करत न्यूझीलंडची धावसंख्या दोनशे पार नेत न्यूझीलंड संघास सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.

पाकिस्तानकडून शाहीन अफरिदी या गोलंदाजाने 10 षटकांत 28 धावा देत 3 विकेटस घेतल्या. तर शादाब खान आणि मोहम्मद आमिर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.