लक्षवेधी: पाकिस्तानच्या मर्कटलीला

स्वप्निल श्रोत्री

पाकिस्तानला युद्धाची नाही तर विकासाची गरज आहे. इम्रान खान यांनी काश्‍मीरचा नाद सोडून “नया पाकिस्तान’कडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे, कारण युद्धाच्या खाईत ते पाकिस्तानला सहज लोटू शकतात. परंतु, नंतर बाहेर मात्र कधीच काढू शकणार नाहीत.

“आधीच मर्कट, त्यात दारू प्यायलेला’ अशा आशयाची म्हण महाराष्ट्रात चंचल स्वभावाच्या व्यक्‍तीचे वर्णन करताना वापरली जाते. परंतु, जर अशी व्यक्‍ती एखाद्या राष्ट्राची प्रमुख असेल आणि तिच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ जर आपली बुद्धी गहाण टाकून बेताल वक्‍तव्ये करीत असेल तर याला काय म्हणावे?

सध्या अशीच काही परिस्थिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीत झाली आहे. भारत सरकारने जम्मू आणि काश्‍मीरला “केंद्रशासित प्रदेश’ करून आता साधारणपणे महिना उलटला आहे, तरीसुद्धा इम्रान खान हे आपले “मर्कट चाळे’ थांबविण्यास काही तयार नाहीत. सुरुवातीला चीन नंतर अमेरिका, संयुक्‍त राष्ट्रे, सौदी अरेबिया, ब्रिटन, मलेशिया, टर्की अशा कितीतरी देशांपुढे हात पसरूनही कोणी दाद देत नाही हे कळल्यावर खान यांनी भारताला थेट अण्वस्त्रे युद्धाची धमकी दिली व त्याचे परिणाम भारतासह संपूर्ण जगाला भोगावे लागतील असा धमकीवजा इशारा त्यांनी अमेरिकेसह इतर महासत्तांना दिला. इम्रान खान यांच्या दोन पावले पुढे जाऊन पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारत-पाक यांच्यातील युद्धाची तारीखसुद्धा जाहीर केली. वास्तविक पाहता, कुटुंबातील एखादी व्यक्‍ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल तिच्यावर उपचार करून तिला आजारातून बाहेर काढणे हे कुटुंबातील इतर सदस्यांचे कर्तव्य असते. परंतु, पाकिस्तान सरकारमध्ये तर सर्वांत जास्त उपचाराची गरज कोणाला आहे हे दाखविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

“काश्‍मीर बनेगा पाकिस्तान’ अशी भावनिक हाक देऊन इम्रान खान यांनी संपूर्ण देशभर “काश्‍मीर अवर’ पाळला. पण, भारताला त्याने काय फरक पडणार आहे? जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारत सरकारने आधीच जाहीर केले असून संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला ते मान्य आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केल्यानंतर ही इम्रान खान यांची बुद्धी ठिकाणावर येत नाही हेच मोठे आश्‍चर्य आहे.

संरक्षण व परराष्ट्र धोरणाच्या तज्ज्ञांच्या मतानुसार युद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी साधनसामग्री, पैसा आणि मजबूत परराष्ट्र धोरण लागते. पाकिस्तानकडे यांपैकी काय आहे? भारताविरोधात जर पाकिस्तानने युद्ध छेडले तर पाकिस्तान 3 दिवस आणि 3 रात्री असे सलग युद्धसुद्धा लढू शकत नाही. युद्ध छोटे असो वा मोठे, युद्धात विजय मिळो अथवा पराजय युद्धानंतर कोणताही देश हा साधारणपणे 50 वर्षे मागे जातो. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर डबघाईला येते, कर्जाचा डोंगर आणि बेरोजगारी वाढते. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली असून जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. आरोग्य सुविधांची वानवा असल्यामुळे रोगराई पसरली आहे अशा परिस्थितीत युद्ध लढण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद पाकिस्तानी लष्कराकडे खरंच आहे का? याचा विचार इम्रान खान व लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी करायला हवा.

अण्वस्त्र युद्धाची धमकी देऊन भारत भयभीत होईल किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय भारताला पाकिस्तान सोबत चर्चा करण्यासाठी टेबलावर येण्यास भाग पडेल, असेही पाकिस्तानने समजण्याचे काही कारण नाही. राजकारण स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय वाऱ्याचा प्रवाह आणि वेग पाहूनच ठरविले जाते. त्यामुळे सध्यातरी बुडत्या जहाजात बसण्यास कोणीही तयार नाही.

अण्वस्त्र युद्धाच्या बाबतीत प्राथमिक नियम असा असतो की, प्रथम अण्वस्त्रे टाकणाऱ्या राष्ट्राने आपल्या शत्रू राष्ट्रावर पहिलाच वार इतका जबरदस्त करावा की शत्रू राष्ट्राला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही पाहिजे. कारण जर शत्रू राष्ट्राला प्रतिकार करण्याची संधी मिळाली आणि ते राष्ट्र जर अण्वस्त्रधारी असेल तर आपल्यावर अण्वस्त्रे पडणार हे निश्‍चित आहे. भारताचे क्षेत्रफळ 32,87,264 चौ.किमी इतके तर 7,517 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. इतक्‍या विशाल खंडप्राय देशावर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी अत्यंत शक्‍तिशाली अशी कमीत कमी 40 अण्वस्त्रे एकाच वेळी भारताच्या वेगवेगळ्या भागांवर पाकिस्तानला टाकावी लागतील आणि तीसुद्धा उत्तर-दक्षिण समांतर आणि हे करणे पाकिस्तानच काय पण जगात अमेरिका व इतर कुणालाही शक्‍य नाही. वास्तव बाजूला ठेवून जर 2 मिनिटे असा विचार केला की, पाकिस्ताने हे शक्‍य केले. तरीसुद्धा पाकिस्तानच्या अण्वस्त्रास उत्तर देण्यास समुद्राच्या पोटात भारताची आय. एन. एस. अरिहंत आहेत. आण्विक त्रिकूट पूर्ण करणाऱ्या जगातील तुरळक देशांत भारताची गणना होते. त्यामुळे भारतावर कोणी कसाही हल्ला करो, अण्वस्त्रांचे उत्तर हे अण्वस्त्रांनीच मिळणार हे निश्‍चित आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारताविरोधात लढण्यासाठी टॅक्‍टिकल (कमी क्षमतेची/कमी नुकसान करणारी) अण्वस्त्रे बनवीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ह्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्‍ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी वेळोवेळी केली आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे, भारतासारख्या खंडप्राय देशावर हल्ला करण्यासाठी पूर्ण क्षमतेची कमीत कमी 40 अण्वस्त्रे गरजेची आहेत त्यात ही टॅक्‍टिकल अण्वस्त्रे पाकिस्तानच्या काय कामाची आहेत?
भारताने जरी “नो फर्स्ट युज पॉलिसी’ जाहीर केली असली तरी युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी विशेषत: इम्रान खान यांनी जरूर वाचावी. त्यात स्पष्ट लिहिले आहे-
1) भारतीय भूभाग किंवा भारतीय सैन्य यांच्यापैकी कोणावरही अण्वस्त्रे पडली तर मात्र भारत अण्वस्त्रे टाकणाऱ्या राष्ट्रावर जबरदस्त अण्वस्त्र हल्ला करणार.

2) भारतीय भूभाग किंवा भारतीय सैन्य यांच्याविरोधात जैविक किंवा रासायनिक अस्त्रांचा जरी वापर झाला तरी भारतासाठी अण्वस्त्र हल्ल्याचा पर्याय खुला असेल.

थोडक्‍यात, अण्वस्त्र हल्ला करताना भारत हा कधीही विचार करणार नाही की पडलेली अण्वस्त्रे मोठे आहेत की लहान आहेत, नुकसान जास्त झाले आहे का कमी झाले आहे. उत्तर मात्र पूर्ण ताकदीनेच मिळणार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)