ऍडलेड – नेदरलॅंडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. मात्र, या विजयाचा लाभ पाकिस्तान संघाला झाला व त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरात असलेला लिंटन दास याने काही चांगले फटके मारले. मात्र, तो बाद झाला. त्यानंतर नजमुल हुसेन शांतो याने सौम्य सरकारसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. सरकारही स्थिरावल्यावर 20 धावा काढून परतला. कर्णधार शबिकने साफ निराशा केली.
अफिफ हुसेनने शांतोला साथ दिली. शांतोने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 54 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 48 चेंडूत 7 चौकार फटकावले. नंतर मात्र पाकच्या शाहिन आफ्रिदी व शादाब खानने त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 127 असा रोखला. शाहिनने 4 तर शादाबने 2 गडी बाद केले.
विजयासाठी 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर महंमद रिझवानने कर्णधार बाबर आझमसह थाटात सुरुवात करताना संघाला अर्धशतकी सलामी दिली. बाबर पुन्हा एकदा निराशाजनक फटका मारून 33 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 25 धावांवर बाद झाला. रिझवानही 32 धावांची खेळी करत 32 चेंडूंचा सामना केल्यावर 2 चौकार व 1 षटकार फटकावून बाद झाला. महंमद नवाजने निराशा केली. त्यानंतर मात्र महंमद हॅरीस व शान मसुद यांनी संघाचे शतक फलकावर लावले.
विजयासाठी 7 धावांची गरज असताना हॅरीस 18 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 31 धावा करून बाद झाला. पाठोपाठ विजयासाठी 13 चेंडूत 2 धावांची गरज असताना इफ्तेकार बाद झाला. मसुदने नाबाद 14 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार फटकावत नाबाद 24 धावांची खेळी केली व संघाचा विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक –
बांगलादेश – 20 षटकांत 8 बाद 127 धावा. (नजमुल हुसेन शांतो 54, सौम्य सरकार 20, अफिफ हुसेन नाबाद 24, शाहिन आफ्रिदी 4-22, शादाब खान 2-30).
पाकिस्तान – 18.1 षटकांत 5 बाद 128 धावा. (महंमद रिझवान 32, महंमद हॅरीस 31, बाबर आझम 25, शान मसुद नाबाद 24, नसुम अहमद 1-14, मुस्तफिजूर रहीम 1-21).